Video: देव तारी त्याला कोण मारी; गाझात 37 दिवसांनी ढिगाऱ्याकाळी बाळ जिवंत सापडले
By ऑनलाइन लोकमत | Published: November 29, 2023 03:06 PM2023-11-29T15:06:56+5:302023-11-29T15:07:41+5:30
Israel-Hamas War Viral Video: हल्ल्यात जमीनदोस्त झालेल्या इमारतीच्या ढिगाऱ्यातून या बाळाला वाचवण्यात आले.
Israel-Hamas War: इस्रायल आणि पॅलेस्टिनी दहशतवादी संघटना हमास, यांच्यात गेल्या महिनाभरापासून युद्ध सुरू आहे. सध्या चार दिवसांचा युद्धविराम घोषित करण्यात आला आहे. या युद्धविरामादरम्यान गाझामधून एक आश्चर्यकारक घटना समोर आली आहे. भीषण युद्धानंतर अनेक इमारती जमीनदोस्त झाल्या होत्या, आता 37 दिवसांनी ढिगाऱ्याखाली एक चिमुकले बाळ जिवंत सापडले आहे. या बाळाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
गल्फ न्यूजच्या रिपोर्टनुसार, ढिगाऱ्याखाली जिवंत सापडलेल्या निष्पाप मुलाचा जन्म इस्रायल-हमास युद्ध सुरू होण्याच्या काही दिवस आधी झाला होता. युद्ध सुरू होताच इस्रायलने गाझा पट्टीवर बॉम्बफेक सुरू केली, ज्यामध्ये अनेक घरे उद्ध्वस्त झाली. सर्वत्र मृतदेहांचे ढीग पडले होते, रुग्णालयांमध्ये मृतदेह ठेवायला जागा नव्हती. बहुतांश शहरे उध्वस्त झाली होती, त्या उद्ध्वस्त घरांमध्ये या निरागस मुलाचेही एक घर होते.
The miracle that came after 37 days. Baby born in the first days of the war was rescued alive from the rubble of the house bombed by Israel pic.twitter.com/pDpQ4bInGi
— Gaza Notifications (@gazanotice) November 27, 2023
रिपोर्टनुसार, इस्रायलच्या बॉम्बहल्ल्यात या निष्पाप मुलाचे घर उद्ध्वस्त झाले, पण त्याचा श्वास थांबत नाही. ढिगाऱ्याखाली गाडला गेल्यावरही हे निष्पाप बाळ 37 दिवस जिवंत राहिले. सिव्हिल डिफेन्सचे सदस्य आणि फोटोग्राफर नोह अल शाघनोबी यांनी इन्स्टाग्रामवर या निष्पाप मुलाची कहाणी सांगणारा व्हिडिओ शेअर केला आहे. ज्यामध्ये तीन तासांच्या अथक परिश्रमानंतर कोसळलेल्या घरातून मुलाला बाहेर काढल्याचे दिसत आहे.
व्हिडिओमध्ये दिसत आहे की, या बाळाला बाहेर काढले तेव्हा तिथे उपस्थित लोक रडू लागले. त्यांनी देवाचे आभार मानले. निरागस बालक जिवंत पाहून बचाव पथकालाही आश्चर्याचा धक्का बसला. इतके तास उपाशी राहून बाळ जगलेच कसे, हा प्रश्न अनेकांना पडला आहे. दरम्यान, या बाळाच्या कुटुंबाबाबत कुठलीही माहिती मिळालेली नाही. ते आता या जगात आहे की, नाही हेदेखील माहित नाही. सध्या त्यांचा शोध घेतला जात आहे.