हमासकडे कोणती शस्त्रे आहेत, ज्याने इस्रायलच्या अत्याधुनिक 'Iron Dome'लाही भेदले, पाहा...
By ऑनलाइन लोकमत | Published: October 9, 2023 03:39 PM2023-10-09T15:39:43+5:302023-10-09T15:40:20+5:30
हमासने शनिवारी इस्रायलवर अचानक हजारो रॉकेट डागले, ज्यात शेकडो नागरिकांचा मृत्यू झाला.
Israel Hamas War: इस्रायलकडे अत्याधुनिक हवाई संरक्षण यंत्रणा आहे. हवेतच शत्रूचे रॉकेट-क्षेपणास्त्रे नष्ट करण्याची क्षमता या यंत्रणेत आहे. 'आयर्न डोम', असे याचे नाव असून, हे कवच कोणीही भेदू शकत नाही, असा इस्रायलचा दावा असतो. पण, 'हमास'ने अवघ्या 20 मिनिटांत इस्रायलवर हजारो रॉकेट डागल्यानंतर या यंत्रणेची पोलखोल झाली.
'आयर्न डोम' एक प्रगत क्षेपणास्त्र प्रणाली आहे. यामध्ये जमिनीवरुन हवेत मारा करणारी क्षेपणास्त्रे आहेत. तसेच, शत्रूची क्षेपणास्त्रे, रॉकेट, ड्रोन दिसताच हल्ला करणारे तंत्रज्ञान आहे. संपूर्ण इस्रायलमध्ये ही यंत्रणा बसवण्यात आली आहे. याची रेंज 70 किलोमीटर आहे. असे असूनही हमासने ही यंत्रणा भेदून, इस्रायलवर हल्ला केला. आता प्रश्न पडतो की, हमासकडे कोणती शस्त्रे आहेत, ज्याद्वारे इस्रायलवर इतक्या मोठ्या प्रमाणात विध्वंस करण्यात आला आहे.
हमासकडील शस्त्रसाठा
शॉर्ट रेंज रॉकेट
- 15 km रेंज असणारे 1000 सेल्फ प्रोपेल्ड रॉकेट सिस्टीम.
- 20 km रेंज असणारे 2500 स्मगलिंगद्वारे मागवलेले रॉकेट.
- 20 km रेंज असलेले 200 ग्रेड रॉकेट्स.
मीडियम रेंज रॉकेट
- 45 किमी रेंज असणारे आधुनिक सेल्फ प्रोपेल्ड ग्रॅड रॉकेट.
- 80 किमी रेंज असणारे रॉकेट, जे हमासने स्वतः बनवले आहे.
लांब पल्ल्याचे रॉकेट
- 100 ते 200 किमी लांब पल्ल्याचे डझनभर रॉकेट हमासकडे आहेत.
हमासच्या रॉकेटमुळे संपूर्ण इस्रायलला धोका...
हमासकडे असलेला शस्त्रसाठा संपूर्ण इस्रायलसाठी धोकादायक आहे. उदा.- R160 रॉकेटची रेंज 160 किलोमीटर आहे. याद्वारे संपूर्ण देशात कुठेही हल्ला करू शकतात. याशिवाय हमासकडे M-75 सारखे 75 किमी पल्ल्याचे रॉकेट्स आहेत, जे 60 किलो वजनाची शस्त्रे वाहून नेऊ शकतात. याशिवाय, 45 किलो शस्त्रास्त्रे वाहून नेणारी 48 किलोमीटरची रेंज असलेले ग्रॅड रॉकेट देखील आहेत. याशिवाय, हमासकडे जीपीएस ड्रोन आणि क्षेपणास्त्रे आहेत.
इस्रायलला पराभूत करण्यासाठी हमास आता सातत्याने शस्त्रे बनवत आहे. यात जीपीएस ड्रोन आणि क्षेपणास्त्रे आहेत. हमास संशोधनात पैसा गुंतवत आहे. हल्ला करणाऱ्या रोबोटिक कार आणि मानवरहित पाणबुड्या बनवण्यात हमास पैसा खर्च करत आहे. हमासच्या नौदलाने समुद्रात किनाऱ्यालगत बोगदेही तयार केले आहेत, ज्याचा उपयोग लपण्यासाठी आणि शस्त्रे आणण्यासाठी केला जातो.