"इस्रायल रुग्ण, आरोग्य कर्मचाऱ्यांच्या जीव धोक्यात घालतोय"; WHO चा मोठा आरोप
By ऑनलाइन लोकमत | Published: December 14, 2023 09:50 AM2023-12-14T09:50:54+5:302023-12-14T09:51:57+5:30
Israel-Hamas war : डब्ल्यूएचओचे प्रमुख टेड्रोस यांनी आरोग्य कर्मचाऱ्यांना ताब्यात घेऊन आणि मदत ट्रकवर हल्ला करून गाझामधील आरोग्य आणि बचाव मोहिमांमध्ये व्यत्यय आणल्याचा इस्रायलवर आरोप केला आहे.
इस्रायलवर 7 ऑक्टोबर रोजी हमासने केलेल्या दहशतवादी हल्ल्यापासून भीषण युद्ध सुरू आहे. दोन महिन्यांहून अधिक काळ सुरू असलेला हा संघर्ष थांबण्याची चिन्हं दिसत नाहीत. याच दरम्यान, वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन (WHO) ने इस्रायलवर आरोप केला आहे की, त्याच्या तपासात उशीर केल्यामुळे गाझामधील एका जखमी रुग्णाला वेळेवर उपचार मिळू शकले नाहीत, ज्यामुळे त्याचा मृत्यू झाला.
डब्ल्यूएचओचे प्रमुख टेड्रोस अदनहोम घेब्रेयेसस यांनी आरोग्य कर्मचाऱ्यांना ताब्यात घेऊन आणि मदत ट्रकवर हल्ला करून गाझामधील आरोग्य आणि बचाव मोहिमांमध्ये व्यत्यय आणल्याचा इस्रायलवर आरोप केला आहे. या सर्व प्रकारामुळे गंभीर जखमी झालेल्या रुग्णाचा मृत्यू झाल्याचं त्यांनी सांगितलं.
Yesterday, @WHO and partners in #Gaza managed to deliver essential trauma and surgical supplies to Al-Ahli hospital to cover the needs of 1500 people, and to transfer 19 critical patients.
— Tedros Adhanom Ghebreyesus (@DrTedros) December 10, 2023
This was another very high-risk mission in the vicinity of active shelling and artillery… pic.twitter.com/NBihupJMMS
"आम्हाला शनिवारी गाझामधील मिशनबद्दल अल-अहली हॉस्पिटलमधून माहिती मिळाली. तपास आणि आरोग्य कर्मचाऱ्यांना बराच काळ ताब्यात घेण्यात आले. आम्ही याबद्दल खूप चिंतित आहोत. अशा कृतींमुळे रुग्णांचा जीव धोक्यात येतो" असं टेड्रोस यांनी म्हटलं आहे.
वादी गाझा चेकपॉईंटवर दोनदा ऑपरेशन थांबवण्यात आलं, तर पॅलेस्टिनी रेड क्राइसेंट सोसायटीच्या काही कर्मचाऱ्यांनाही उत्तर गाझाकडे जाताना आणि परत येताना ताब्यात घेण्यात आलं असा आरोप केला आहे. कर्मचारी गाजा शहरात आले तेव्हा वैद्यकीय पुरवठा घेऊन जाणारा एक ट्रक आणि रुग्णवाहिकेला गोळीबाराचा फटका बसला.
घेब्रेयेसस पुढे म्हणाले की, एवढंच नाही तर अनेक रुग्ण आणि रेड काइसेंट कर्मचाऱ्यांना रुग्णवाहिकेतून बाहेर काढण्यात आलं आणि अनेक तास चौकशी करण्यात आली. इतका वेळ थांबल्याने वाटेतच एका रुग्णाचा मृत्यू झाला. गाझातील लोकांना काळजी घेण्याचा अधिकार आहे. युद्धातही आरोग्य यंत्रणा सुरक्षित ठेवली पाहिजे.