इस्रायलला भारताची मोठी मदत; लेबनॉन सीमेवर भारतीय सैन्याची तैनाती
By ऑनलाइन लोकमत | Published: October 15, 2023 06:53 PM2023-10-15T18:53:37+5:302023-10-15T18:53:48+5:30
अमेरिकेनंही इस्रायलच्या मदतीसाठी दोन युद्धनौका पाठवल्या आहेत.
Israel-Hamas War: इस्रायल आणि हमास, यांच्यात 7 ऑक्टोबरपासून संघर्ष पेटला आहे. हमासच्या हल्ल्यानंतर इस्रायली सैन्य गाझा पट्टीवर जोरदार हल्ले करत आहेत. यादरम्यान लेबनॉनची दहशतवादी संघटना, हिजबुल्लाह इस्रायलवर हल्ले करत आहे. इस्रायलला अनेक आघाड्यांवर युद्ध लढावे लागत आहे. अशा परिस्थितीत युद्धाने वेढलेल्या इस्रायलच्या मदतीसाठी भारतीय सुरक्षा दल पोहोचला आहे. इस्रायल आणि लेबनॉनच्या दक्षिण सीमेवर भारतीय सुरक्षा दल तैनात करण्यात आला आहे.
रिपोर्टनुसार, लेबनीज नागरिकांच्या हत्येच्या प्रत्युत्तरात हिजबुल्लाहने उत्तर इस्रायलवर हल्ला करण्याचे आवाहन केले आहे. अशा परिस्थितीत सीमेवर भारतीय दल तैनात करण्यात आला आहे. दरम्यान, इस्रायलच्या मदतीसाठी अमेरिकेनेही दोन विमानवाहू युद्धनौका भूमध्य समुद्रात पाठवल्या आहेत. यूएसएस गेराल्ड आर फोर्ड आणि यूएसएस आयझेनहॉवर, या अमेरिकन युद्धनौका मदतीसाठी आल्या आहेत.
अमेरिका सोमवारपासून आपल्या नागरिकांचे रेस्क्यू सुरू करणार आहे. यासाठी अमेरिकेने विमानाची व्यवस्था केली आहे. इस्रायलमध्ये हजारो अमेरिकन नागरिक राहतात, अशी माहिती दूतावासाने दिली आहे. 7 ऑक्टोबर रोजी हमासच्या हल्ल्यात 29 अमेरिकन ठार झाल्याची पुष्टी झाली आहे, तर आणखी 15 लोक बेपत्ता आहेत. यामुळेच अमेरिकेने आपल्या नागरिकांच्या सुटकेसाठी ऑपरेशन सुरू केले आहे.