9 वर्षांची मुलगी हमासच्या कैदेत; वडील पाहताहेत लेकीची वाट म्हणाले, "आयुष्यात एकच ध्येय..."
By ऑनलाइन लोकमत | Published: November 24, 2023 02:19 PM2023-11-24T14:19:29+5:302023-11-24T14:20:22+5:30
हमास करारानुसार 50 ओलिसांची सुटका करेल. यामध्ये कोणकोणत्या लोकांना सामावून घेतले जाईल याची स्पष्ट माहिती देण्यात आलेली नाही.
इस्रायल-हमास युद्धादरम्यान आता अनेक ओलीस ठेवलेल्या लोकांना सोडलं जाणार आहे. याच दरम्यान, 9 वर्षांच्या मुलीचे वडील आपल्या मुलीला भेटण्याची वाट पाहत आहेत. हमासने 7 ऑक्टोबर रोजी इस्रायलवर झालेल्या हल्ल्यात एमिली हँडचे अपहरण केले होते. दोन्ही बाजूंनी चार दिवसांच्या युद्धविराम कराराची माहिती समोर आल्यानंतर एमिली हँडच्या वडिलांना खूप आनंद झाला आहे.
हमास करारानुसार 50 ओलिसांची सुटका करेल. यामध्ये कोणकोणत्या लोकांना सामावून घेतले जाईल याची स्पष्ट माहिती देण्यात आलेली नाही. 63 वर्षीय थॉमस हँड यांनी द गार्जियनला सांगितलं की, "दोन्ही बाजूंच्या संबंधित लोकांसाठी हे खूप चांगलं आहे. यामुळे मला आशा वाटत आहे. परंतु जोपर्यंत मी तिला पाहत नाही, स्पर्श करत नाही तोपर्यंत मी कोणत्याही गोष्टीवर विश्वास ठेवणार नाही. मी तिला समोरासमोर पाहत नाही तोपर्यंत मी कशावरही विश्वास ठेवणार नाही."
लंडनमध्ये एका पत्रकार परिषदेदरम्यान थॉमस हँडने आपल्या आयुष्याला एक वाईट स्वप्न म्हटलं आहे. "मला माहीत आहे की, इस्रायली सरकार आणि सैन्य त्यांना परत आणण्यासाठी सर्व प्रयत्न करत आहे" असं देखील सांगितलं. सुरुवातीला असं मानलं जात होतं की दक्षिण इस्रायलमध्ये हमासच्या हल्ल्यात एमिली मारली गेली, परंतु नंतर इस्रायलने सांगितले की एमिली 240 ओलिसांपैकी एक आहे.
एमिली वडील म्हणतात, "माझी छोटी मुलगी एमिलीला परत मिळवण्यासाठी शक्य ते सर्व प्रयत्न करणे हेच माझं ध्येय आहे." इस्रायलच्या परराष्ट्र मंत्रालयानेही आपल्या फेसबुक पेजवर एक व्हिडीओ शेअर केला आणि लिहिले की, या सुंदर मुलीची एमिली हँडची हमासच्या दहशतवाद्यांनी 7 ऑक्टोबर रोजी हत्या केली होती. पण आता आम्हाला असं कळलं आहे की तिला हमासने ओलीस म्हणून ठेवलं आहे.