लेबनॉनची अवस्था गाझासारखी करू; इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांचा थेट इशारा
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 9, 2024 21:23 IST2024-10-09T21:21:57+5:302024-10-09T21:23:03+5:30
इस्रायल आणि हिजबुल्लाहमधील संघर्ष दिवसेंदिवस वाढत आहे.

लेबनॉनची अवस्था गाझासारखी करू; इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांचा थेट इशारा
Israel Hezbollah Conflict: इस्रायल आणि लेबनॉनमधील दहशतवादी संघटना हिजबुल्लामधील संघर्ष दिवसेंदिवस भीषण होत चालला आहे. दरम्यान, इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांनी मंगळवारी (08 ऑक्टोबर) एका व्हिडिओ संदेशाद्वारे लेबनॉनला कडक शब्दात इशारा दिला. 'हिजबुल्लाहला तुमच्या देशात काम करू दिले, तर तुमच्या देशाची परिस्थिती गाझासारखी होऊ शकते,' असं नेतन्याहू म्हणाले.
पंतप्रधान बेंजामिन यांचे हे विधान अशावेळी आले आहे, जेव्हा इस्रायली सैन्याने लेबनॉनच्या दक्षिणेकडील किनारपट्टीवर हिजबुल्लाहच्या विरोधात आपले आक्रमण तीव्र केले आहे. या भागात इस्रायलने आपले अतिरिक्त सैन्य तैनात केले असून, येथे राहणाऱ्या नागरिकांना हा परिसर रिकामा करण्याचा सल्ला दिला आहे.
لديكم فرصة لإنقاذ لبنان قبل أن يقع في هاوية حرب طويلة من شأنها أن تؤدي إلى الدمار والمعاناة كما نراه في غزة. pic.twitter.com/sLcxXvSh7X
— Benjamin Netanyahu - בנימין נתניהו (@netanyahu) October 8, 2024
बेंजामिन नेतन्याहू यांचे आव्हान!
लेबनीज लोकांना उद्देशून नेतान्याहू यांनी पुढील विनाश टाळण्यासाठी त्यांच्या देशाला हिजबुल्लाच्या तावडीतून मुक्त करण्याचे आवाहन केले. ते म्हणाले, 'लेबनॉनला भीषण युद्धात पडण्यापूर्वी वाचवण्याची संधी तुमच्याकडे आहे. हिजबुल्लाहला आपल्या देशात कारवाया करण्यापासून रोखा, अन्यथा गाझासारखा तुमचाही विनाश अटळ आहे. लेबनॉनमधील नागरिकांनी आपला देश हिजबुल्लाहपासून मुक्त करावा आणि हे युद्ध थांबवावे,' असेही नेतान्याहू म्हणाले.
संघर्ष कधी वाढला?
गेल्यावर्षी 7 ऑक्टोबर 2023 पासून हा संघर्ष सुरू आहे. हमासने इस्रायलवर भयंकर हल्ला केला होता, ज्यामध्ये एक हजाराहून अधिक नागरिक मारले गेले. तेव्हापासून हमासचा समर्थक गट हिजबुल्लाहदेखील या युद्धात उतरला आणि इस्रायलवर हल्ले सुरू केले. यानंतर इस्रायल आणि हिजबुल्लाह यांच्यातील संघर्ष वाढला. सध्या इस्रायल हिजबुल्लाह आणि हमास, अशा दोन दहशतवादी संघटनांशी सामना करत आहे.