Israel Hezbollah : हिजबुल्लाहचा इस्रायलवर मोठा हल्ला; १६५ हून अधिक क्षेपणास्त्रे डागली, हायफामध्ये हाहाकार
By ऑनलाइन लोकमत | Published: November 12, 2024 07:59 AM2024-11-12T07:59:29+5:302024-11-12T08:04:09+5:30
Israel Hezbollah Conflict : इस्रायलची हवाई संरक्षण यंत्रणा आयर्न डोम देखील हा हल्ला रोखण्यात अपयशी ठरली आहे.
Israel Hezbollah Conflict : हिजबुल्लाहने सोमवारी (दि.११) इस्रायलवर मोठा हल्ला केला. हिजबुल्लाहने इस्रायलच्या उत्तरेकडील भागात एकापाठोपाठ एक १६५ हून अधिक क्षेपणास्त्रे डागली आहेत. या हल्ल्यात एका मुलासह सात जण जखमी झाले. तसेच, काही इमारती जमीनदोस्त झाल्याची माहिती समोर येत आहे.
इस्रायलची हवाई संरक्षण यंत्रणा आयर्न डोम देखील हा हल्ला रोखण्यात अपयशी ठरली आहे. यामध्ये अनेक वाहनांना आग लागली आहे. हायफावरील हा आतापर्यंतचा सर्वात मोठा हल्ला होता, ज्यामध्ये हिजबुल्लाहने सलग दोन हल्ल्यांमध्ये अंदाजे ९० हून अधिक क्षेपणास्त्रे डागली आहेत. पहिल्या हल्ल्यांदरम्यान ८० क्षेपणास्त्रे डागली. आयडीएफने सांगितले की, बहुतेकांना रोखण्यात आले, परंतु अनेक लक्ष्यित निवासी क्षेत्रे आहेत.
टाईम्स ऑफ इस्रायलच्या अहवालानुसार, १० क्षेपणास्त्रांची दुसरी लाट एकतर रोखली गेली किंवा खुल्या भागात पडली. इस्रायली लष्कराने सांगितले की, आम्ही आमच्या नागरिकांचे हिजबुल्लाहच्या हल्ल्यांपासून संरक्षण करत राहू. दुसरीकडे, इस्रायलचे परराष्ट्र मंत्री गिदोन सार यांनी लेबनॉनसोबतच्या युद्धविराम चर्चेबाबत निश्चित प्रगती होत असल्याचे म्हटले आहे.
#Northern_Israel_Is_Under_Attack
— Israel Defense Forces (@IDF) November 11, 2024
We will continue to defend our civilians against Hezbollah’s aggression. pic.twitter.com/0fd0Wq6pxa
याचबरोबर, गॅलीलीवर जवळपास ५० क्षेपणास्त्रे डागली आहेत. त्यापैकी काही हवाई संरक्षण यंत्रणेने हाणून पाडली. कारमील परिसरात आणि आसपासच्या शहरांमध्ये अनेक क्षेपणास्त्रे पाडली, असे इस्रायली लष्कराने सांगितले. दरम्यान, हिजबुल्लाहने या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली आहे. कारमील परिसरातील पॅराट्रूपर्स ब्रिगेडच्या प्रशिक्षण तळाला लक्ष्य करण्यात आल्याचा दावा हिजबुल्लाहने केला आहे.
हिजबुल्लाहच्या या हल्ल्यानंतर काही वेळेने इस्रायली लष्कराने म्हटले की, लेबनॉनमधून प्रक्षेपित केलेल्या ड्रोनला मलाकियाच्या उत्तरेकडील किबुट्झवर हवाई संरक्षणाद्वारे रोखण्यात आले. लेबनॉनचा आणखी एक ड्रोन पश्चिम गॅलीलीमधील लिमन शहराजवळील मोकळ्या भागात क्रॅश झाला, ज्यामुळे झाडाला आग लागली. यामुळे शहरवासियांमध्ये खळबळ उडाली.