हिजबुल्लाहचा नवा प्रमुख सैफुद्दीन आठवडाभरही कमान सांभाळू शकला नाही, इस्रायलच्या हल्ल्यात ठार!
By ऑनलाइन लोकमत | Published: October 5, 2024 07:22 PM2024-10-05T19:22:49+5:302024-10-05T19:23:57+5:30
Israel-Hezbollah War: इस्रायलच्या हल्ल्यादरम्यान सैफुद्दीन एका बहुमजली इमारतीखाली बांधलेल्या बंकरमध्ये आपल्या कमांडर्ससोबत बैठक घेत होता.
Israel-Hezbollah War: गेल्या काही दिवसांपूर्वी इस्रायलच्या हल्ल्यात लेबनॉनमध्ये हिजबुल्लाहचा प्रमुख नेता सय्यद हसन नसराल्लाह याचा मृत्यू झाला. यानंतर हिजबुल्लाहचा नवा प्रमुख हाशेम सैफुद्दीन हा सुद्धा इस्रायलच्या हल्ल्यात मारला गेल्याचे वृत्त आहे. सैफुद्दीनला मारण्यासाठी इस्रायलने दक्षिण बेरूतमध्ये क्षेपणास्त्र हल्ला केला. इस्रायलच्या हल्ल्यादरम्यान सैफुद्दीन एका बहुमजली इमारतीखाली बांधलेल्या बंकरमध्ये आपल्या कमांडर्ससोबत बैठक घेत होता.
दरम्यान, लेबनॉनमध्ये इस्रायलने केलेल्या हल्ल्याबद्दल सांगायचे झाल्यास २७ सप्टेंबर रोजी इस्रायलने बेरूतसह हिजबुल्लाहच्या सर्व ठिकाणांवर बॉम्बफेक केली. यावेळी इस्रायलने हिजबुल्लाहच्या मुख्यालयावर जोरदार हवाई हल्ला केला. या हल्ल्यानंतर इस्रायलने दावा करण्यात आली की, त्यांनी हिजबुल्लाह संघटना जवळजवळ पूर्णपणे नष्ट केली आहे. हिजबुल्लाहचा क्षेपणास्त्र साठा नष्ट करण्याचा दावाही इस्रायलने केला आहे. यानंतर हिजबुल्लाचा प्रमुख हसन नसराल्लाह आणि त्याची मुलगी इस्रायलच्या हल्ल्यात ठार झाल्याची बातमी समोर आली. याबाबत हिजबुल्लाहकडून दुजोरा देण्यात आला नव्हता.
नसराल्लाहचा मृत्यू कसा झाला?
मीडिया रिपोर्ट्समध्ये हिजबुल्लाहच्या सूत्रांच्या हवाल्याने म्हटले आहे की, हिजबुल्लाहच्या मुख्यालयावर हल्ला होऊनही हसन नसरल्लाह वाचला आहे. या रिपोर्टनंतर इस्रायली संरक्षण दलाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की, या हल्ल्यानंतर नसराल्लाह जिवंत राहू शकेल, यावर त्यांचा विश्वास नाही. सध्या इस्रायल नसराल्लाह यांच्या मृत्यूची चौकशी करत आहे. या वक्तव्यानंतर काही तासांनी इस्रायलने नसराल्लाहचा मृत्यू झाल्याची पुष्टी केली. रॉयटर्सच्या वृत्तानुसार, इस्रायली हल्ल्याच्या वेळी नसराल्लाह मुख्यालयाऐवजी दुसऱ्या इमारतीत लपला होता, जिथे इस्रायली हल्ल्यानंतर पसरलेल्या विषारी वायूमुळे त्यांचा मृत्यू झाला.
मध्यपूर्वेतील युद्धाचा तणाव
इस्रायलच्या हल्ल्यात हिजबुल्लाहचा प्रमुख नेता सय्यद हसन नसराल्लाह याचा मृत्यू झाला. यानंतर इस्रायल आणि हिजबुल्लाह यांच्यातील संघर्ष आता पेटला आहे. यातच इस्रायलच्या या कारवाईमुळे इराणचा तीळपापड झाला असून, गेल्या चार दिवसांपूर्वी इराणने इस्रायलवर शेकडो क्षेपणास्त्रांसह जोरदार हल्ला चढवला. आता इस्रायलने इराणला प्रत्युत्तर देण्याची तयारी केली आहे. त्यामुळे मध्यपूर्वेतील युद्धाचा तणाव जगभर दिसून येत आहे. इस्रायल आणि इराण हे दोघेही एकमेकांना उद्ध्वस्त करण्याबाबत भाष्य करत आहेत. इस्रायलकडून हवाई हल्ले झाले तर इराण बदला घेण्याची एकही संधी सोडणार नाही.