"खोलीत क्षेपणास्त्रे, गॅरेजमध्ये रॉकेट ठेवणाऱ्यांकडून...", हवाई हल्ल्यादरम्यान नेतन्याहू यांचा लेबनॉनला संदेश

By ऑनलाइन लोकमत | Published: September 24, 2024 10:54 PM2024-09-24T22:54:19+5:302024-09-24T23:07:59+5:30

आज हल्ल्यात इस्रायली सैन्याने हिजबुल्लाहच्या रॉकेट विभागाचा प्रमुख कमांडर इब्राहिम कुबैसी याला ठार केले आहे.

israel hezbollah war in lebanon, benjamin netanyahu warned lebanese | "खोलीत क्षेपणास्त्रे, गॅरेजमध्ये रॉकेट ठेवणाऱ्यांकडून...", हवाई हल्ल्यादरम्यान नेतन्याहू यांचा लेबनॉनला संदेश

"खोलीत क्षेपणास्त्रे, गॅरेजमध्ये रॉकेट ठेवणाऱ्यांकडून...", हवाई हल्ल्यादरम्यान नेतन्याहू यांचा लेबनॉनला संदेश

पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांनी इस्रायली गुप्तचर तळाला भेट दिली आणि हिजबुल्ला विरुद्ध सुरू असलेल्या संघर्षावर चर्चा केली. तसेच, लेबनीज जनतेला त्यांनी शांततेचे आवाहन केले आणि हिजबुल्लाहवरील कारवाईचे समर्थन केले. आमचे युद्ध तुमच्याशी नाही. तुम्ही सुरक्षित ठिकाणी जा, असे आम्ही कालच सांगितले होते असे नेतन्याहू म्हणाले. 

पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू म्हणाले की, "आमची लढाई तुमच्या लोकांच्या विरोधात नाही आहे, आमची लढाई हिजबुल्लाहविरुद्ध आहे. नसरल्लाह तुम्हाला विनाशाकडे घेऊन जात आहे. मी तुम्हाला काल सांगितले होते की, त्याने ज्या घरांमध्ये क्षेपणास्त्रे ठेवली आहेत, ती घरे खाली करा, जिथे राहण्याच्या खोलीत क्षेपणास्त्रे आणि गॅरेजमध्ये रॉकेट आहेत, ते सुरक्षित राहणार नाहीत. हिजबुल्लाह आणि नसरल्लाह यांच्या तावडीतून स्वत:ला मुक्त करा, ते तुमच्याच भल्यासाठी आहे."

दरम्यान, इस्रायलकडून हिजबुल्लाच्या ठिकाणांना लक्ष्य केले जात आहे. तर हिजबुल्लाह देखील सतत त्यांच्यावर बॉम्बफेक करत आहे. नुकत्याच झालेल्या पेजर आणि वॉकी-टॉकी स्फोटांनंतर इस्रायलने हिजबुल्लाविरुद्ध मोठ्या कारवाया सुरू केल्या आहेत. सातत्याने रॉकेट-क्षेपणास्त्र हल्ले केले जात आहेत. आज हल्ल्यात इस्रायली सैन्याने हिजबुल्लाहच्या रॉकेट विभागाचा प्रमुख कमांडर इब्राहिम कुबैसी याला ठार केले आहे.

इस्रायलने हिजबुल्लाहच्या अनेक कमांडरचा खात्मा केला आहे, इस्रायलकडून सातत्याने हल्ले करत आहेत. या हल्ल्यात सहा जण ठार झाले आहेत. दुसरीकडे, हिजबुल्लाहकडून देखील रॉकेट हल्ले होत आहेत. आतापर्यंतच्या संघर्षात हिजबुल्लाला मोठा धक्का बसला आहे. या हल्ल्यामुळे आणि प्रतिहल्ल्यामुळे इस्रायल आणि हिजबुल्ला यांच्यात मोठे युद्ध होण्याची भीती वाढली आहे.

जागतिक व्यापारावरही परिणाम होण्याची शक्यता 
या युद्धामुळे तेल उत्पादनावर परिणाम होऊ शकतो. यामुळे जागतिक बाजारात कच्च्या तेलाच्या किमती वाढतील. त्यामुळे पेट्रोल आणि डिझेलच्या किमती वाढू शकतात. मध्यपूर्वेत लेबनॉनचे स्थान अतिशय महत्त्वाचे आहे. त्यामुळे या युद्धाचे जागतिक व्यापारावरही परिणाम होऊ शकतात. अशा परिस्थितीत जगाला पुन्हा महागाईचा सामना करावा लागू शकतो.
 

Web Title: israel hezbollah war in lebanon, benjamin netanyahu warned lebanese

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.