इस्रायलमध्ये मिसाईल हल्ल्यात भारतीयाचा मृत्यू, 2 जण जखमी; लेबनान संघटनेवर आरोप
By ऑनलाइन लोकमत | Published: March 5, 2024 11:22 AM2024-03-05T11:22:01+5:302024-03-05T11:24:09+5:30
हमाससोबत सुरू असलेल्या युद्धादरम्यान लेबनानमधून इस्रायलवर केलेल्या अँटी टँक मिसाईल हल्ल्यात एका भारतीय नागरिकाचा मृत्यू झाला असून दोन जण जखमी झाल्याची घटना समोर आली आहे.
हमाससोबत सुरू असलेल्या युद्धादरम्यान लेबनानमधून इस्रायलवर केलेल्या अँटी टँक मिसाईल हल्ल्यात एका भारतीय नागरिकाचा मृत्यू झाला असून दोन जण जखमी झाल्याची घटना समोर आली आहे. इस्रायलच्या उत्तर सीमेजवळ हा हल्ला करण्यात आला.
रिपोर्टनुसार हे तीन भारतीय केरळचे रहिवासी आहेत. हा मिसाईल हल्ला सोमवारी सकाळी 11 वाजता इस्रायलच्या गॅलील भागात झाला. असे सांगण्यात येत आहे की हे मिसाईल एका शेतात पडले, जिथे काम करणारे लोक त्याच्या प्रभावाखाली आले. या हल्ल्यात मृत्यू झालेल्या भारतीय नागरिकाचे नाव पटनीबिन मॅक्सवेल असे असून तो केरळमधील कोल्लम येथील रहिवासी आहे. बुश जोसेफ जॉर्ज आणि पॉल मेल्विन अशी जखमींची नावे आहेत.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, मिसाईल हल्ल्यात जखमी झालेल्या जॉर्जला जवळच्या बेलिनसन रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. त्याचा चेहरा भाजला आहे. त्याच्यावर शस्त्रक्रिया केली जात आहे. त्याला निरीक्षणाखाली ठेवण्यात आले आहे. तो भारतात आपल्या कुटुंबाशी बोलू शकतो. तर मेल्विनला किरकोळ दुखापत झाली असून त्याला उत्तर इस्रायलमधील जिव्ह रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. तो केरळमधील इडुक्की येथील रहिवासी आहे.
We are deeply shocked and saddened by the death of one Indian national and the injury of two others due to a cowardly terror attack launched by Shia Terror organization Hezbollah, on peaceful agriculture workers who were cultivating an orchard at the northern village of Margaliot…
— Israel in India (@IsraelinIndia) March 5, 2024
लेबनानच्या हिजबुल्लाहने हा हल्ला केल्याचे मानले जात आहे. 8 ऑक्टोबरपासून ते इस्रायलवर सातत्याने रॉकेट, मिसाईल आणि ड्रोन हल्ले करत आहे. इस्रायलमधील एका भारतीयाच्या मृत्यूबद्दल शोक व्यक्त करताना, इस्रायलमधील भारतीय दूतावासाने एक निवेदन जारी करून म्हटले आहे की, "हिजबुल्लाच्या भ्याड दहशतवादी हल्ल्यात नुकतेच एका शेतात काम करणाऱ्या भारतीय नागरिकाच्या मृत्यूचा आम्ही तीव्र निषेध करतो."
"आमच्या प्रार्थना आणि संवेदना पीडित आणि जखमींच्या कुटुंबियांसोबत आहेत. इस्त्रायली वैद्यकीय संस्था जखमींना सर्वोत्तम उपचार देत आहेत. इस्रायल दहशतवादाच्या घटनांमध्ये मारल्या गेलेल्या प्रत्येक नागरिकाला समान वागणूक देतो, मग तो भारतीय असो वा परदेशी." या युद्धामुळे अनेक ठिकाणी गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे.