१०० हून अधिक लढाऊ विमाने... पाच शहरांवर हल्ला... इराणचे किती झाले नुकसान?
By ऑनलाइन लोकमत | Published: October 26, 2024 12:15 PM2024-10-26T12:15:45+5:302024-10-26T12:22:37+5:30
Israel Iran Conflict : इराणमधील क्षेपणास्त्र निर्मिती प्रकल्प आणि इतर ठिकाणांना लक्ष्य करून हल्ले करण्यात आल्याचे इस्रायलने म्हटले आहे.
Israel Iran Conflict : इस्रायल आणि इराण यांच्यातील संघर्ष आता दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे. इस्रायलने शनिवारी इराणवर हवाई हल्ला केला. या हल्ल्यात इस्रायलने इराणच्या १० ठिकाणांना लक्ष्य केले. दरम्यान, इराणने १ ऑक्टोबर रोजी इस्रायलवर बॅलिस्टिक क्षेपणास्त्रांनी हल्ला केला होता,त्याचा बदला म्हणून इस्रायलने इराणच्या लष्करी ठिकाणांना लक्ष्य केले. तसेच, पाच शहरांवर हल्ला केला. यावेळी इराणवर हल्ला करण्यासाठी इस्रायलने १०० हून अधिक लढाऊ विमाने पाठवली होती.
या हल्ल्यादरम्यान इराणची राजधानी तेहरानपर्यंत स्फोटांचे आवाज ऐकू आले. या हल्ल्यांमुळे दोन कट्टर शत्रूंमधील युद्धाचा धोका वाढला आहे. जेव्हा गाझामधील इराण-समर्थित अतिरेकी गट हमास आणि लेबनॉनमधील हिजबुल्ला पश्चिम आशियातील इस्रायलशी आधीच युद्धात आहेत. इराणमधील लष्करी ठिकाणांवर थेट हल्ले करण्यात आल्याचे इस्रायली लष्कराने शनिवारी सांगितले. दोन इस्रायली अधिकाऱ्यांनी नाव न सांगण्याच्या अटीवर सांगितले की, या हल्ल्यांमध्ये आण्विक किंवा तेल सुविधांना लक्ष्य करण्यात आले नाही.
दुसरीकडे, तेहरानमधील एका रहिवाशाने सांगितले की, हल्ल्याच्या पहिल्या टप्प्यात किमान सात स्फोट ऐकू आले, ज्यामुळे आसपासच्या भागातील लोकांमध्ये घबराट पसरली. शनिवारी सकाळी इराणने देशाचे हवाई क्षेत्र बंद केले आहे. इराणच्या लष्कराने शनिवारी सकाळी सांगितले की, इस्रायलने इलाम, खुजेस्तान आणि तेहरान प्रांतातील लष्करी लक्ष्यांना लक्ष्य केले आणि पाच शहरांवर हल्ला केला. या हल्ल्यात जास्त नाही परंतु किरकोळ नुकसान झाले.
दरम्यान, इस्रायलने केलेल्या हल्ल्यात इराणच्या नुकसानाशी संबंधित कोणतेही चित्र अद्याप समोर आलेले नाही.इराणच्या लष्कराने दावा केला आहे की, त्यांच्या हवाई संरक्षण यंत्रणेने हल्ल्यांमुळे होणारे नुकसान सीमित केले आहे. मात्र, या संदर्भात त्यांनी कोणतेही पुरावे दिले नाहीत. तर इराणमधील क्षेपणास्त्र निर्मिती प्रकल्प आणि इतर ठिकाणांना लक्ष्य करून हल्ले करण्यात आल्याचे इस्रायलने म्हटले आहे.
इराणमध्ये हल्ले केल्यानंतर त्यांची विमाने सुखरूप परतली आहेत, असेही इस्रायलने म्हटले आहे.इस्रायली लष्कराने सांगितले की त्यांच्या विमानांनी मिसाईल निर्मिती प्रकल्पांवर हल्ला केला ज्याचा वापर इराणने गेल्या वर्षी इस्रायलवर डागलेली क्षेपणास्त्रे बनवण्यासाठी केला होता. या क्षेपणास्त्रांमुळे इस्रायलच्या नागरिकांना थेट आणि आपत्कालीन धोका निर्माण झाला असल्याचे लष्कराने म्हटले आहे.