इस्रायलचा इराणवर मोठा हल्ला,अनेक शहरांवर बॉम्बवर्षाव, इराण प्रत्युत्तर देण्याच्या तयारीत
By ऑनलाइन लोकमत | Published: October 26, 2024 08:47 AM2024-10-26T08:47:27+5:302024-10-26T08:48:49+5:30
Iran-Israel War : इस्रायलच्या संरक्षण दलाने या हल्ल्याला दुजोरा दिला असून, इस्त्रायली लष्कर इराणच्या लष्करी लक्ष्यांवर अनेक महिन्यांपासून इस्त्रायलच्या विरोधात सतत करत असलेल्या हल्ल्यांना प्रत्युत्तर म्हणून हल्ले करत आहे.
Iran-Israel War :इस्रायलनेइराणवर मोठा हवाई हल्ला केला आहे. जवळपास २५ दिवसांनी इराणवर मोठा हल्ला करून इस्रायलने प्रत्युत्तर दिले. इराणच्या अनेक शहरांमध्ये स्फोट झाले आहेत. दरम्यान, हल्ल्यांचा तेल प्रकल्प किंवा आण्विक साइटवर परिणाम झाला नाही. केवळ लष्करी तळांना लक्ष्य करण्यात आले आहे, असे इराणी मीडियाने म्हटले आहे.
इराणने १ ऑक्टोबर रोजी इस्रायलवर सुमारे १८० क्षेपणास्त्रे डागली होती. यानंतर, इराणला या हल्ल्याची किंमत चुकवावी लागेल, असे इस्रायलच्या बाजूने सांगण्यात आले होते. दरम्यान, आता इस्रायलच्या बाजूने प्रत्युत्तराची कारवाई करण्यात आली आहे. इराणच्या माध्यमांनी दिलेल्या माहितीनुसार, हवाई संरक्षण यंत्रणेने बहुतेक क्षेपणास्त्रे हवेतच पाडली.
इराणमधील लष्करी लक्ष्यांवर इस्रायली हल्ले स्वसंरक्षणार्थ करण्यात आले आहेत. या महिन्याच्या सुरुवातीला इराणने बॅलेस्टिक क्षेपणास्त्र हल्ला केला होता. प्रत्युत्तर म्हणून इस्रायलने हा हल्ला केला आहे, असे इस्रायली हल्ल्यांबाबत अमेरिकेच्या व्हाईट हाऊसने म्हटले आहे. त्याचवेळी इस्रायलच्या राष्ट्रीय सुरक्षा परिषदेचे प्रवक्ते सीन सेवेट यांनी सांगितले की, "लष्करी लक्ष्यांना लक्ष्य करणारे हल्ले स्वसंरक्षणार्थ आणि इराणने १ ऑक्टोबर रोजी इस्रायलवर केलेल्या बॅलिस्टिक क्षेपणास्त्र हल्ल्याला प्रत्युत्तर म्हणून केले गेले."
#BREAKING
— Tehran Times (@TehranTimes79) October 26, 2024
Tehran air defense systems interceptions... pic.twitter.com/iugVIPrtNX
दरम्यान, इस्रायलने इराणच्या अनेक शहरांवर हल्ले केले आहेत. तेहरानसह इराणमधील इतर शहरांतील लष्करी तळांवर हा हल्ला करण्यात आला आहे. इराणच्या प्रसारमाध्यमांनी या हल्ल्याला दुजोरा दिला असून या हल्ल्यात अणु स्थळांना लक्ष्य करण्यात आले नसल्याचे म्हटले आहे. केवळ लष्करी तळांना लक्ष्य करण्यात आले आहे. तेहरानमध्ये जोरदार स्फोटांचा आवाज ऐकू आला. इस्रायलने एकाच वेळी अनेक लक्ष्यांवर हल्ले केले आहेत.
इस्रायलच्या संरक्षण दलाने या हल्ल्याला दुजोरा दिला असून, इस्त्रायली लष्कर इराणच्या लष्करी लक्ष्यांवर अनेक महिन्यांपासून इस्त्रायलच्या विरोधात सतत करत असलेल्या हल्ल्यांना प्रत्युत्तर म्हणून हल्ले करत आहे. इराण आणि तेथील लोक ७ ऑक्टोबरपासून इस्रायलवर सातत्याने हल्ले करत आहेत. त्यामुळे इस्रायललाही उत्तर देण्याचा अधिकार आहे, असे इस्रायलने म्हटले आहे.