इस्रायल आमचे पहिले लक्ष्य, आम्हाला साऱ्या जगावर राज्य करायचे आहे; हमासच्या कमांडरची दर्पोक्ती
By ऑनलाइन लोकमत | Published: October 14, 2023 01:09 PM2023-10-14T13:09:19+5:302023-10-14T13:10:39+5:30
"इस्रायल हे तर आमचे पहिले लक्ष्य आहे. मात्र, आम्हाला खरेतर साऱ्या जगावर राज्य करायचे आहे..."
गाझा : सर्व जगावर आमचे राज्य प्रस्थापित करू, अशी दर्पोक्ती हमास या दहशतवादी संघटनेचा कमांडर महमूद अल् झहर याने केली आहे. इस्रायल व हमास यांच्यात सुरू झालेल्या संघर्षानंतर झहर याचा व्हिडीओ समाजमाध्यमांमध्ये झळकला आहे. त्यात झहरने म्हटले आहे की, इस्रायल हे तर आमचे पहिले लक्ष्य आहे. मात्र, आम्हाला खरेतर साऱ्या जगावर राज्य करायचे आहे, असे त्याने म्हटले आहे.
महमूद अल् झहरने म्हटले आहे, या जगात कोणीही कोणावर अन्याय करू नये, पॅलेस्टिनी, अरब नागरिकांना ज्या हिंसाचाराला सामोरे जावे लागले, तशी वेळ कोणावरही येऊ नये, याची आम्ही दक्षता घेणार आहोत. लेबनॉन, सिरिया, इराक व अन्य देशांतील अरब नागरिकांचा आतापर्यंत विविध प्रकारे छळ करण्यात आला आहे. तशी वेळ यापुढे कोणावरही येऊ नये, यासाठी हमास संघटना प्रयत्नशील राहणार आहे. त्याचसाठी आम्हाला साऱ्या जगावर राज्य करायचे आहे. एवढेच नाही तर, हमासचा कमांडर महमूद अल् झहर याने या व्हिडीओत म्हटले आहे की, जगात काही विशिष्ट धर्मांची मंडळी कोणावरही अन्याय करणार नाहीत, यासाठी हमास संघटना दक्ष राहणार आहे.
इस्रायली हल्ल्यात ७० ठार -
गाझा शहरातून बाहेर पडणाऱ्या लोकांच्या समूहांवर इस्रायलने केलेल्या हवाई हल्ल्यात ७० लोक ठार झाले आहेत. यात बहुतेक महिला आणि मुले आहेत, असे हमासच्या मीडिया कार्यालयाने सांगितले.
मोठ्या संघर्षाची वाढती भीती -
इस्रायलने अलीकडच्या काही दिवसांत लेबनॉनच्या हिजबुल्ला या अतिरेकी गटावरही हल्ला केला. सध्या येथील सीमेवर शांतता असली, तरी व्यापक संघर्षाची भीती निर्माण झाली आहे. जगभरातील अनेक देशांमध्ये मुस्लीम प्रार्थनांमध्ये इस्रायलने केलेल्या हल्ल्याचा निषेध केल्यानंतर जेरुसलेमच्या जुन्या शहरात तणाव वाढला आहे.
१३ ओलिसांचा मृत्यू
इस्रायलने गाझावर केलेल्या हवाई हल्ल्यात ओलीस ठेवलेल्या १३ इस्रायलींचा मृत्यू झाल्याचे हमासने म्हटले आहे. ७ ऑक्टोबरच्या हल्ल्यानंतर हमासने त्यांना ओलिस ठेवले होते.
२७ अमेरिकनांचा मृत्यू
युद्धात किमान २७ अमेरिकन नागरिकांचा मृत्यू झाला आहे. १४ लोक अद्याप बेपत्ता आहेत. युद्धग्रस्त भागात आपल्या नागरिकांना बाहेर काढण्यासाठी अमेरिका चार्टर विमाने पाठविणार असल्याचे व्हाइट हाउसने जाहीर केले.