इस्रायलने ऑस्कर विजेत्या पॅलेस्टाईन दिग्दर्शकाचे अपहरण केले, जबर मारहाण; गाझावर बनविलेला सिनेमा
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 25, 2025 15:14 IST2025-03-25T15:14:28+5:302025-03-25T15:14:42+5:30
हमदन बल्लाल यांना इस्रायलने ओलीस ठेवले आहे. बल्लाल यांचे सह दिग्दर्शक युवल अब्राहम यांनी एक्सवर याची माहिती दिली आहे.

इस्रायलने ऑस्कर विजेत्या पॅलेस्टाईन दिग्दर्शकाचे अपहरण केले, जबर मारहाण; गाझावर बनविलेला सिनेमा
इस्रायलने पुन्हा गाझा पट्टीवर हल्ले सुरु केले आहेत. हमासच्या दहशतवाद्यांविरोधात पुन्हा हवाई तसेच जमीनीवरून कारवाया सुरु झाल्या आहेत. अमेरिकेने काही दिवसांपूर्वीच मोठेपणा मिरवत युद्ध थांबविल्याचे जाहीर केले होते. याला दोन, तीन आठवडे उलटत नाहीत तोच इस्रायलने गाझापट्टीत मोठे हल्ले सुरु केले आहेत. यापुढे जाऊन इस्रायल आता हमासच्या मार्गावर निघाला आहे. ऑस्कर पुरस्कार विजेत्या पॅलेस्टाईन दिग्दर्शकाचे अपहरण करण्यात आले आहे.
हमदन बल्लाल यांना इस्रायलने ओलीस ठेवले आहे. बल्लाल यांचे सह दिग्दर्शक युवल अब्राहम यांनी एक्सवर याची माहिती दिली आहे. काही इस्रायली लोकांनी वेस्ट बँक भागातून हमदन यांना त्यांच्या घराजवळ पकडले. त्यांना जबर मारहाण केली आहे. त्यांच्या डोक्याला आणि पोटावर दुखापत झाली आहे. हमदन यांनी जेव्हा अॅम्बुलन्स बोलावली तेव्हा इस्रायली सैनिकांनी ती रोखली आणि हमदन यांना पळवून नेले. या घटनेपासून हमदन यांची काहीच माहिती मिळत नाहीय, असे त्यांनी या पोस्टमध्ये म्हटले आहे.
हमदानला इस्रायली वस्तीतील पोलिस ठाण्यात ठेवण्यात आल्याचा दावा युवल यांनी केला आहे. तसेच त्याला कोणालाही भेटण्याची किंवा बोलण्याची परवानगी नाही. वकीलही त्याच्याशी बोलू शकत नाहीत. या परिस्थितीत ते कसे आहेत हे माहिती नाही, असे युवल यांनी म्हटले आहे.
सीएनएननेयाबाबत वृत्त दिले आहे. यामध्ये बल्लाल यांच्या घराबाहेर काही इस्रायली जमले होते. घराबाहेर इस्रायली पोलिस आणि सैन्यही उपस्थित होते. बल्लालला मदत करण्याचा प्रयत्न करणाऱ्या प्रत्येकावर इस्रायली सैनिक गोळीबार करत होते.
या दोघांनी मिळून ‘नो अदर लँड’ असा सिनेमा बनविला आहे. या सिनेमाला ऑस्करमध्ये बेस्ट डॉक्युमेंट्री अवॉर्ड मिळाला होता. युद्धादरम्यान पॅलेस्टाईन कार्यकर्ता आणि युवल यांच्यातील मैत्री आणि संघर्ष या सिनेमात दाखविला आहे.