इस्राईलने केला अल कायदाच्या मोस्ट वाँटेंड दहशतवाद्याचा खात्मा, लादेनची सूनही ठार
By बाळकृष्ण परब | Published: November 14, 2020 04:48 PM2020-11-14T16:48:22+5:302020-11-14T17:19:54+5:30
Mosad News : इस्राईलची खतरनाक गुप्तहेर संघटना असलेल्या मोसादने इराणमध्ये जबरदस्त कारवाई करत अल कायदाचा कुख्यात दहशतवादी अबू मोहम्मद मसरी ऊर्फ अब्दुल्ला अहमद अब्दुल्ला याला ठार केले आहे.
तेरहान - इस्राईलची खतरनाक गुप्तहेर संघटना असलेल्या मोसादने इराणमध्ये जबरदस्त कारवाई करत अल कायदाचा कुख्यात दहशतवादी अबू मोहम्मद मसरी ऊर्फ अब्दुल्ला अहमद अब्दुल्ला याला ठार केले आहे. ५८ वर्षीय अब्दुल्ला हा इराणमध्ये राहत होता. अब्दुल्लावर १९९८ मध्ये आफ्रिकेतील अमेरिकेच्या दोन दूतावासांवर झालेल्या बॉम्ब हल्ल्यातील मास्टर माइंडचे सहकार्य केल्याचा आरोप होता.
स्फुटनिक या वृत्तसंस्थेने दिलेल्या वृत्तानुसार अब्दुल्ला याला इस्राईलची गुप्तहेर संघटना मोसादच्या गुप्त पथकाने कंठस्नान घातले. न्यूयॉर्क टाइम्समधील वृत्तानुसार अमेरिकेच्या आदेशावर इस्राइलच्या गुप्त एजंट्सनी इराणमध्ये अब्दुल्ला याला ठार केले. ही कारवाई ७ ऑगस्ट रोजी करण्यात आली होता. या वृत्तानुसार मोसादच्या या कारवाईत अब्दुल्ला याच्यासोबत त्याची मुलगी आणि ओसामा बिन लादेनचा पुत्र हामजा बिन लादेन याची विधवा पत्नीही मारली गेली.
मात्रा अब्दुल्ला याला ठार मारण्याच्या मोहिमेत अमेरिकेची काय भूमिका होती, हे स्पष्ट होऊ शकलेले नाहीत. मात्र अमेरिकेची त्याच्यावर दीर्घ काळापासून नजर होती. तसेच अब्दुल्लाचे नाव एफबीआयच्या १७० मोस्ट वाँटेड दहशतवाद्यांच्या यादीत सातव्या क्रमांकावर होते. न्यूयॉर्क टाइम्सच्या वृत्तानुसार अब्दुल्ला हा सन २०१५ पासून तेरहानमधील पसदरान जिल्ह्यात राहत होता.
१९ वर्षांपूर्वी ११ सप्टेंबर २००१ रोजी वर्ल्ड ट्रेड सेंटर आणि पेंटागॉनवर झालेल्या हल्ल्यानंतर अमेरिकेने सन २०११ मध्ये ओसामा बिन लादेनला ठार करण्यात आले होते. तत्कालीन राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांच्या आदेशानुसार सीआयए, एसएडी आमि एसओजीने केलेल्या संयुक्त कारवाईत ओसामा बिन लादेन ठार झाला होता. तो पाकिस्तानमध्ये लपून बसला होता.