इस्रायलने गाझा युद्धात गुप्त कारवाई सुरू केली! २३ दिवसांनंतर महिला सैनिकाची हमासच्या तावडीतून सुटका
By ऑनलाइन लोकमत | Published: October 31, 2023 08:44 AM2023-10-31T08:44:52+5:302023-10-31T08:45:10+5:30
मेगिडिश ही एक निरीक्षण सैनिक होती तिला ७ ऑक्टोबर रोजी इस्रायलच्या ओझ तळावरील हल्ल्यानंतर हमासने ओलीस ठेवले होते.
गाझामधील हमासच्या स्थानांवर इस्रायलचा बॉम्बहल्ला सुरूच आहे. इस्रायलच्या हवाई दलानंतर आता भूदलानेही कारवाई सुरू केली आहे. इस्रायली ग्राउंड ऑपरेशनचे उद्दिष्ट हमासचा पूर्णपणे नाश करणे आणि ओलीसांना मुक्त करणे हा आहे. दरम्यान, इस्रायलच्या सुरक्षा दलांनी सोमवारी ७ ऑक्टोबरला हमासने ओलीस ठेवलेल्या महिला सैनिकाची सुटका केली. IDF दिलेल्या माहितीनुसार, गाझा पट्टीमध्ये रात्रभर चाललेल्या गुप्त कारवाईनंतर एका महिला सैनिकाची हमासच्या तावडीतून सुटका करण्यात आली.
आज महाराष्ट्र बंद? सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर स्टेटस, पोस्ट; नेमके काय...
इस्रायली संरक्षण दल आणि शिन बेट सुरक्षा एजन्सीने सांगितले की, महिला सैनिक, ओरी मेगिडिश, बरी आहे आणि तिचे कुटुंबाशी पुनर्मिलन झाले आहे. इस्रायली सैन्याने केलेल्या ग्राउंड ऑपरेशन दरम्यान तिची सुटका करण्यात आली. मेगिडिश ही एक निरीक्षण सैनिक होती तिला ७ ऑक्टोबर रोजी इस्रायलच्या ओझ तळावरील हल्ल्यानंतर हमासने ओलीस ठेवले होते. शिन बेट आणि आयडीएफने त्यांच्या बचाव कार्याबद्दल अधिक माहिती दिली नाही. अशा कारवायांची माहिती दिल्यास भविष्यातील कारवायांवर परिणाम होऊ शकतो, असे इस्रायली लष्कराचे मत आहे.
७ ऑक्टोबर या दिवशी हमासने इस्रायलमध्ये नरसंहार घडवला. या हल्ल्यांमध्ये १४०० हून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे. याशिवाय हमासच्या सैनिकांनी किमान २४३ नागरिकांना बंधक बनवून गाझामध्ये नेले होते. यापैकी चार जणांना हमासने सोडले आहे.
इस्रायली लष्कराने आपल्या सैनिकांच्या सुटकेसाठी अनेक दिवस अगोदरच ऑपरेशनचे नियोजन केले होते. यादरम्यान हमास आणि इस्रायली सैनिकांमध्ये चकमक झाल्याचे सांगण्यात येत आहे. मात्र, या काळात कोणत्याही इस्रायली सैनिकाला इजा झाली नाही. मेगिडिशच्या सुटकेच्या बातमीनंतर त्याच्या मूळ गावी किरयत गटात उत्सव साजरा झाला. व्हिडिओमध्ये त्यांचे कुटुंबीय घरात आनंदोत्सव साजरा करताना आणि समर्थक इमारतीबाहेर जमताना दिसत आहेत.