इस्रायलचा बेरूतमध्ये मोठा हवाई हल्ला, अनेक इमारतींचे नुकसान, सात मुलांसह २३ जणांचा मृत्यू
By ऑनलाइन लोकमत | Published: November 14, 2024 09:33 AM2024-11-14T09:33:57+5:302024-11-14T09:38:07+5:30
स्थानिक मीडियानुसार, इस्रायलने हा हल्ला लेबनॉनमधील बेरूतच्या उत्तरेकडील अलमात गावात केला. इस्रायलच्या हल्ल्यात अनेक इमारतींचे नुकसान झाले आहे.
इस्रायल आणि हिजबुल्लाह यांच्यातील संघर्ष सुरुच आहे. बुधवारी (दि.१४) इस्रायली सैन्याने लेबनीज राजधानी बेरूतजवळील एका गावात हवाई हल्ला केली. या हल्ल्यात सात मुलांसह २३ जणांचा मृत्यू झाला असून सहा जण जखमी झाल्याची माहिती समोर आली आहे. स्थानिक मीडियानुसार, इस्रायलने हा हल्ला लेबनॉनमधील बेरूतच्या उत्तरेकडील अलमात गावात केला. इस्रायलच्या हल्ल्यात अनेक इमारतींचे नुकसान झाले आहे.
या हल्ल्यानंतर इस्रायल आता नागरिकांना लक्ष्य करत असल्याचा आरोप लेबनीज सरकारने केला आहे. ज्या गावात हल्ला झाला त्या गावात हिजबुल्लाह संघटनेचे कोणतेही तळ नव्हते किंवा संघटनेचा कोणताही सदस्य तेथे राहत नव्हता. या गावात इस्रायली हल्ल्यात मृत्युमुखी पडलेले सर्व सामान्य लोक होते, असे लेबनीज सरकारने म्हटले आहे. दुसरीकडे, इस्रायलचे म्हणणे आहे की त्यांनी हिजबुल्लाहच्या ठिकाणांना लक्ष्य करून हा हल्ला केला आहे.
९ आणि १० नोव्हेंबरलाही झाला होता मोठा हल्ला
यापूर्वी ९ नोव्हेंबर आणि १० नोव्हेंबर रोजी इस्रायली हवाई दलाने लेबनॉनवर हवाई हल्ले केले होते. दक्षिण आणि पूर्व लेबनॉनच्या वेगवेगळ्या भागात हे हल्ले करण्यात आले होते. याशिवाय, इस्रायली विमानांनी राजधानी बेरूतपासून टायर या बंदर शहरापर्यंत हिजबुल्लाहच्या ठाण्यांना लक्ष्य केले होते.
आतापर्यंत ३१०० हून अधिक लोकांचा मृत्यू
दुसरीकडे, या हल्ल्यामुळे संतप्त झालेल्या हिजबुल्लाहने इस्रायलच्या सीमेवर डझनभर रॉकेट डागले आहेत. गेल्या वर्षी ऑक्टोबरमध्ये इस्रायलवर हमासने हल्ला केला होता. यानंतर इस्रायलने हमास आणि हिजबुल्लाहविरोधात युद्धाची घोषणा केली होती. तेव्हापासून इस्रायल हा हमास आणि हिजबुल्लाहविरोधात संघर्ष आहे. गाझापट्टी व्यतिरिक्त इस्रायल लेबनॉनवरही हिजबुल्लाह संघटना संपवण्यासाठी सतत हल्ले करत आहे. इस्रायलच्या हल्ल्यात आतापर्यंत ३१०० हून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे, तर १४ हजारांहून अधिक लोक जखमी झाले आहेत.