Israel-Palestine Conflict : गाझामध्ये इस्रायलचे हल्ले सुरूच; एअरस्ट्राइकमध्ये 213 जणांचा मृत्यू, एकमेव कोरोना लॅबही उद्ध्वस्त
By ऑनलाइन लोकमत | Published: May 19, 2021 09:51 AM2021-05-19T09:51:26+5:302021-05-19T09:53:25+5:30
यूनायटेड नेशनने (यूएन) इस्रायल आणि पॅलेस्टाइन यांच्यात सुरू असलेल्या या हिंसाचाराला मानवी आपत्ती, असे म्हटले आहे.
इस्रायल आणि पॅलेस्टाइन यांच्यातील तणाव सातत्याने वाढताना दिसत आहे. हमासकडून इस्रायलवर रॉकेट हल्ले केले जात आहेत, तर इस्रायलदेखील एअरस्ट्राइक करून हमासला प्रत्युत्तर देत आहे. हे सर्व हल्ले गाझामध्ये होत आहेत. इस्रायलच्या या हल्ल्यांत गाझा येथील एकमेव कोरोना टेस्टिंग लॅबही उद्ध्वस्त झाली आहे.
गाझाच्या आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या निवेदनात म्हटले आहे, की इस्लामिक समूह हमासविरोधात सुरू असलेल्या इस्रायली युद्धाचा परिणाम सामान्य लोकांवर होत आहे. इस्रायलकडून मानवी वस्ती असलेल्या भागांत करण्यात आलेल्या हल्ल्यांत आतापर्यंत 213 पॅलेस्टिनी नागरिकांचा मृत्यू झाला आहे. यात 61 मुलांचा समावेश आहे. याशिवाय 1400 हून अधिक नागरीक जखमी झाले आहेत.
यूनायटेड नेशनने (यूएन) इस्रायल आणि पॅलेस्टाइन यांच्यात सुरू असलेल्या या हिंसाचाराला मानवी आपत्ती, असे म्हटले आहे. यूएनच्या म्हणण्याप्रमाणे, इस्रायलच्या एअरस्ट्राइकमुळे आतापर्यंत 40 हजार पॅलेस्टिनी नागरिकांना एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जावे लागले आहे. एवढेच नाही, तर जवळपास 2500 पॅलेस्टिनी नागरिकांना आपले घर गमवावे लागले आहे. या हिंसाचारात इस्रायलकडून मरणारांची संख्याही 12 झाली आहे.
हमासने नुकतेच दक्षिण एशकोल भागात रॉकेट हल्ले केले. यात एका कारखान्यात काम करत असलेल्या दोन थाई नागरिकांचा मृत्यू झाला तर इतर काही लोक जखमी झाले आहेत. यापूर्वी, हमासच्या रॉकेट हल्ल्यात केरळमधील एका भारतीय महिलेचाही मृत्यू झाला होता. ही महिला येथे नर्स म्हणून काम करत होती.
इस्रायलच्या एअरस्ट्राइकमध्ये गाझातील एकमेवर कोरोना टेस्टिंग लॅबही उद्ध्वस्त झाली आहे. यामुळे पॅलेस्टाइनची अडचण आणखी वाढली आहे. गाझात कोरोना रुग्णांची संख्याही वेगाने वाढताना दिसत आहे. येथील पॉझिटिव्हिटी रेट जवळपास 28 टक्के आहे. येथे, ज्या रुग्णालयांवर 15 वर्षांपासून इस्रायलची नाकाबंदी आहे, त्या रुग्णालयांत कोरोना रुग्णांवर उपचार होत आहेत. येथे मोठ्या प्रमाणावर रुग्ण आहेत. गाझाची लोकसंख्या 2 मिलियन असल्याचे सांगण्यात येते. इस्रायली हल्ल्यांत गाझातील अनेक घरांचे मोठे नुकसान झाले आहे.