"दहशतवाद्यांनी माझ्यावर गोळ्या झाडायला सुरुवात केलीय...": मृत्यूपूर्वी कुटुंबीयांना पाठवला मेसेज
By ऑनलाइन लोकमत | Published: October 12, 2023 06:14 PM2023-10-12T18:14:20+5:302023-10-12T18:15:32+5:30
Israel Palestine Conflict : 19 वर्षीय कॉर्पोरल नामा बोन हिच्यावरही हमासने हल्ला केला होता. मृत्यूपूर्वी बोनने कुटुंबीयांना अंगावर काटा आणणारा मेसेज पाठवला होता.
इस्रायलमध्ये गेले 6 दिवस युद्ध सुरू आहे. दोन्ही बाजूंनी वेगाने हल्ले केले जात आहेत. या काळात युद्धात चार हजारांहून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे. यामध्ये 1300 इस्रायली नागरिक आणि 220 हून अधिक इस्रायली सैनिक होते. 77 व्या बटालियनमध्ये तैनात असलेल्या 19 वर्षीय कॉर्पोरल नामा बोन हिच्यावरही हमासने हल्ला केला होता. मृत्यूपूर्वी बोनने कुटुंबीयांना अंगावर काटा आणणारा मेसेज पाठवला होता.
शनिवारी हमासने हल्ला केला त्यावेळी ती ड्युटीवर होती. हल्ल्यादरम्यान हमासच्या सैनिकांनी झाडलेल्या गोळ्यांना ती बळी पडली. कशी तरी तिला लपायला जागा सापडली. यावेळी तिने कुटुंबीयांना शेवटचा मेसेज पाठवला. इस्रायलच्या 'वाय नेट'नुसार, बोनने जखमी अवस्थेत कुटुंबीयांना मेसेज पाठवला होता. "मला तुम्हा सर्वांची खूप काळजी वाटत आहे. माझ्या डोक्यावर एक जखम आहे. खूप रक्तस्त्राव होत आहे. दहशतवाद्यांनी माझ्यावर गोळ्या झाडायला सुरुवात केली आहे" असं म्हटलं आहे.
कॉर्पोरल नामा बोनने "माझ्यासोबत एक जखमी सैनिक आहे, पण बचाव पथक त्याला वाचवू शकलं नाही. काही दहशतवादी इथे आले आहेत, ते इथून निघून जाणार नाहीत. मला ओरडण्याचा आवाज ऐकू येत आहे. मला असं वाटतंय की कदाचित इथे कोणालातरी जीवे मारले जात आहे" असं म्हटलं आहे. गाझा येथून हजारो क्षेपणास्त्रे डागण्यात आली. शेकडो मृतदेह रस्त्यावर पडले होते. स्फोटांमुळे इमारती उद्ध्वस्त झाल्या.
'वाय नेट'ने नामा बोनचे नातेवाईक इलुक यांच्याशी संवाद साधला. इलुक म्हणाले, "हल्ला झाला तेव्हा नामा बोन ही मिलिट्री स्टेशनच्या गेटवर तैनात होती. पहाटे साडेतीन वाजेपर्यंत ती आम्हाला मेसेज करत होती, मात्र त्यानंतर तिने कोणताही मेसेज केला नाही. जेव्हा कुटुंबीय त्या ठिकाणी पोहोचलं तेव्हा तिला रुग्णालयात दाखल करण्यात आल्याचं सांगितलं. मात्र तिच्या प्रकृतीबद्दल कुटुंबीयांना कोणीही माहिती दिली नाही. मृत्यू झाल्याचं म्हटलं जात आहे." 7 ऑक्टोबरपासून सुरू झालेल्या युद्धात आतापर्यंत 4 हजारांहून अधिक लोक मारले गेले आहेत. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.