'हमास' पॅलेस्टाईनमधील सर्वात शक्तिशाली संघटना कशी बनली? इस्रायलसोबत किती वेळा युद्ध झाले? जाणून घ्या...
By ऑनलाइन लोकमत | Published: October 8, 2023 01:04 PM2023-10-08T13:04:54+5:302023-10-08T13:05:55+5:30
पॅलेस्टाईनमधील हमास ही सर्वात शक्तिशाली संघटना कशी बनली आणि इस्रायल आणि पॅलेस्टाईनमध्ये किती वेळा संघर्ष झाला, त्या बद्दल जाणून घ्या...
इस्रायल आणि पॅलेस्टिनी अतिरेकी संघटना हमास यांच्यात पुन्हा संघर्ष सुरू आहे. शनिवारी (दि.७) इस्रायलवर हमासने रॉकेट हल्ला केला, त्याला प्रत्युत्तर म्हणून इस्रायलने युद्ध घोषित केले. दरम्यान, इस्रायल आणि पॅलेस्टाईनमधील वाद नवा नाही. दोघांमधील वाद १०० वर्षांहून अधिक जुना आहे. पॅलेस्टाईनमधील हमास ही सर्वात शक्तिशाली संघटना कशी बनली आणि इस्रायल आणि पॅलेस्टाईनमध्ये किती वेळा संघर्ष झाला, त्या बद्दल जाणून घ्या...
हमास आणि इस्रायल यांच्यातील लढाईचा मोठा इतिहास आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, हमास १९८० च्या दशकात एक संघटना बनली आणि सध्या पॅलेस्टाईनमधील सर्वात शक्तिशाली संघटना आहे. पॅलेस्टाईनच्या इस्लामिक संघटनांमध्ये ही सर्वात मोठी आणि सर्वात प्रभावशाली आहे. हमास, म्हणजेच इस्लामिक रेझिस्टन्स मूव्हमेंटची स्थापना १९८० मध्ये शेख अहमद यासिन यांनी केली होती. इस्त्रायलविरुद्ध बंड करण्यासाठी हमासची स्थापना झाली. हमासने १९८८ मध्ये पॅलेस्टाईनला मुक्त करण्यासाठी स्थापन केल्याची घोषणा केली होती.
हमासने आत्तापर्यंत अनेक वेळा इस्रायलवर हल्ले केले असून त्यात अनेक आत्मघाती हल्ले आहेत. २००६ मध्ये गाझामध्ये सत्तापालट करून २००७ मध्ये गाझा पूर्णपणे ताब्यात घेतला. यावरून हमास किती शक्तिशाली आहे, याचा अंदाज लावता येतो. सध्या गाझा पट्टीवर हमासची सत्ता आहे. येथूनच हमासने इस्रायलवर हल्ला केला. इस्रायल याला दहशतवादी संघटना मानतो, तर ब्राझील, चीन, इजिप्त, इराण, नॉर्वे, कतार आणि रशियासह अनेक देश हमासला दहशतवादी संघटना मानत नाहीत.
२०१४ मध्ये ५० दिवस चालला संघर्ष
हमास आणि इस्रायलमध्ये अनेक युद्धे झाली आहेत. २०१४ च्या युद्धात दोन हजारांहून अधिक पॅलेस्टिनी आणि सुमारे ८० इस्रायली मारले गेले. हा संघर्ष ५० दिवस चालला. त्यानंतर २०२१ मध्ये अल अक्सा मशिदीमध्ये इस्रायली सैन्य आणि हमास यांच्यात चकमक झाली होती, ज्यामध्ये शेकडो पॅलेस्टिनी ठार झाले होते.
१३ वर्षांत चार वेळा झाले युद्ध
इतकेच नाही तर इस्रायल आणि पॅलेस्टाईनमध्ये १३ वर्षांत चार युद्धे झाली. २००८-०९, २०१२, २०१४ आणि २०२१ मध्ये दोन्ही देशांमध्ये संघर्ष झाला होता. युद्धामुळे पॅलेस्टिनींचा संघर्ष वाढत आहे. बेरोजगारीसारख्या अनेक समस्याही त्याठिकाणी निर्माण होत आहेत.