"तुम्ही चुकीचं बोलताय.."; इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा अमेरिकच्या बायडन यांच्यावर पलटवार
By ऑनलाइन लोकमत | Published: March 11, 2024 12:12 PM2024-03-11T12:12:53+5:302024-03-11T12:15:25+5:30
नेतन्याहू यांच्याबद्दल जो बायडेन काय म्हणाले होते, वाचा सविस्तर
Joe Biden vs Benjamin Netanyahu, US Israel: अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांनी काही दिवसांपूर्वी इस्रायलबद्दल एक विधान केले होते. हमास विरोधात सुरू असलेल्या युद्धासंदर्भात इस्रायलची रणनीति चुकीची वाटते आणि त्यामुळे ते स्वत:चेच नुकसान करत आहेत अशा आशयाचे वक्तव्य बायडेन यांनी केले होते. त्या इस्रायलबाबतच्या वक्तव्यावरुन निर्माण झालेल्या वादाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांनी पलटवार केला आहे.
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांनी शनिवारी सांगितले होते की, त्यांना वाटते की इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू गाझामधील हमासविरुद्धच्या युद्धनीतीने इस्रायलला मदत करण्याऐवजी दुखावत आहेत. अमेरिकन नेत्याने ७ ऑक्टोबरच्या हल्ल्यानंतर हमासच्या विरोधात कारवाई करण्याच्या इस्रायलच्या अधिकाराला पाठिंबा व्यक्त केला, परंतु या कारवाईमुळे निष्पाप लोकांच्या मृत्यूच्या घटनांकडे नेतन्याहू यांनी अधिक लक्ष दिले पाहिजे असेही सांगितले.
७ ऑक्टोबर २०२३ रोजी हमासने इस्रायलवर केलेल्या हल्ल्यात ५००० रॉकेट्स डागले होते. या हल्ल्यात हजारो लोक मारले गेले. त्यानंतर दोन्ही बाजूंमध्ये युद्ध सुरू होते. या युद्धात आतापर्यंत दोन्ही बाजूंचे सुमारे ३० हजार लोक मरण पावले असून लाखो लोक बेघर झाले, असा दावा करण्यात आला होता. पण नेतन्याहू म्हणाले की, जर बायडेन यांना वाटत असेल की मी इस्रायलच्या इच्छेविरुद्ध धोरणे राबवत आहे किंवा त्यांच्या हितसंबंधांना हानी पोहोचवत आहे, तर ते चुकीचे बोलत आहे.
दरम्यान, गाझामध्ये मोठ्या प्रमाणात नागरिकांच्या मृत्यूमुळे इस्रायलला आंतरराष्ट्रीय पाठिंबा गमावू शकतो, असे बायडेन अनेक महिन्यांपासून सांगत आहेत. बायडेन यांनी गाझामध्ये मारल्या गेलेल्या लोकांच्या मोठ्या संख्येबद्दल बोलले. हे इस्रायलच्या वचनबद्धतेच्या विरुद्ध आहे आणि मला वाटते की ही एक मोठी चूक आहे, असेही बायडेन म्हणाले होते.