"आम्ही थांबणार नाही, येत्या काळात युद्ध अजून आक्रमक होईल"; पंतप्रधान नेत्यनाहूंचा इशारा
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 26, 2023 15:13 IST2023-12-26T15:11:19+5:302023-12-26T15:13:15+5:30
इस्रायलकडून अजूनही हमासचा नायनाट करण्याचीच भाषा

"आम्ही थांबणार नाही, येत्या काळात युद्ध अजून आक्रमक होईल"; पंतप्रधान नेत्यनाहूंचा इशारा
Israel Hamas War - Pm Benjamin Netanyahu ( Marathi News ) : इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांनी पुन्हा एकदा हमासचा पूर्णपणे नायनाट करण्याची भाषा केली आहे. इस्रायल सरकार गाझामधील हमासविरूद्धचे युद्ध थांबवू शकते, असे अंदाज काही प्रसारमाध्यमांनी व्यक्त केला होता. ते अंदाज चुकीचे असल्याचे नेतन्याहू यांच्या ताज्या विधानावरून स्पष्ट झाले. "गाझातील युद्ध अद्याप संपलेले नाही. आम्ही थांबत नसून लढा सुरूच ठेवत आहोत. आगामी काळात आम्ही लढा अधिक तीव्र करणार आहोत. हे युद्ध दीर्घकाळ सुरू राहणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. सध्या तरी हे युद्ध संपण्याच्या जवळपास नाही."
अमेरिका आणि इराणच्या मदतीच्या सैन्याने एकमेकांवर हल्ला केल्यास संघर्ष वाढू शकतो या चिंतेने युद्धविरामाचे जागतिक आवाहन करण्यात येत होते. पण नेतन्याहू यांनी ते नाकारले आहे. उत्तर गाझामध्ये इस्रायली सैन्याची भेट घेतल्यानंतर नेतान्याहू यांनी त्यांच्या पक्षाच्या खासदारांना सांगितले की युद्ध अद्याप संपलेले नाही. इस्रायलला लष्करी दबाव न आणता हमासच्या ताब्यातून ओलीसांची सुटका करण्याचा आमचा प्रयत्न आहे. जोवर हमासचा नाश करणार नाही तोवर आम्ही थांबणार नाही. यापेक्षा कमी काहीही आम्ही स्वीकारणार नाही, असे नेतन्याहू म्हणाले.
दरम्यान, नेतन्याहू यांनी युद्धात मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याचे मान्य केले. गाझामधील युद्धाची आमच्याकडून फार मोठी किंमत मोजावी लागत आहे. गाझामध्ये आमचे सैनिक सतत आपले प्राण गमावत आहेत पण लढा सुरू ठेवण्याशिवाय आमच्याकडे पर्याय नाही. हमासवर पूर्ण विजय मिळेपर्यंत आम्ही गाझामध्ये लढू. आमचे ध्येय साध्य करण्याआधी आम्ही मागे हटणार नाही. आम्हाला हमासची लष्करी आणि राजकीय शक्ती पूर्णपणे संपवायची आहे. यामध्ये यश मिळवण्याआधी आम्ही थांबणार नाही.