दोन महिन्यांपासून देशासाठी लढणाऱ्या आपल्याच सैनिकाला इस्रायल पोलिसांनीच का केली अटक?
By ऑनलाइन लोकमत | Published: January 2, 2024 01:28 PM2024-01-02T13:28:35+5:302024-01-02T13:29:10+5:30
इस्रायलचे पंतप्रधान नेत्यनाहू यांच्यासोबतच्या फोटोतही दिसतोय 'तो' सैनिक
Israel Hamas War at Gaza : इस्रायल-गाझा युद्धादरम्यान एक मोठी बातमी समोर आली आहे. इस्रायलने आपल्याच सैन्यातील एका जवानाला अटक केली असल्याचे बोलले जात आहे. इस्रायली सैन्याचा गणवेशातील ही व्यक्ती गेले २ महिने हमासविरुद्ध युद्ध करत आहे. रोई यिफ्राच (Roi Yifrach) असे या व्यक्तीचे नाव आहे. इस्त्रायली सैन्याचा गणवेश परिधान करून युद्ध लढल्याचा आरोप रोईवर आहे. याशिवाय या व्यक्तीवर शस्त्रे चोरल्याचाही आरोप आहे. असे आरोप का करण्यात आले आहेत? नक्की हे प्रकरण काय आहे.. जाणून घेऊया
रोई याने यापूर्वी कधीही सैन्यात काम केले नव्हते. पण ७ ऑक्टोबरच्या युद्धानंतर, तो इस्रायली सैन्याच्या युनिटमध्ये दाखल झाला. त्याने सैन्याचा गणवेश परिधान केला आणि हमासच्या विरोधात लढला. गाझामध्ये पोहोचल्यानंतर तो दोन महिने हमासच्या सैनिकांशी लढला पण गेल्या महिन्याच्या १७ तारखेला त्याला अटक करण्यात आली. ३५ वर्षीय रोईवर सैन्यात लढण्याचा आणि शस्त्रे चोरल्याचा आरोप आहे. रोई यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, ७ ऑक्टोबर रोजी हमासच्या हल्ल्यानंतरच्या गोंधळाच्या परिस्थितीचा फायदा घेत लष्कराच्या वेशात युद्धात सामील झाल्याचा आरोप रोईवर आहे. यावेळी त्याने शस्त्रे, युद्ध साहित्य आणि अनेक संवेदनशील दळणवळण उपकरणे चोरली. हमासच्या युद्धादरम्यान तो गाझामध्ये अनेकदा दिसला होता. इस्रायली मीडियानुसार, तो पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांच्यासोबतही दिसला. पंतप्रधान नेतन्याहू गाझा येथे युद्ध परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी गेले होते, तेव्हा त्यांनी सैनिकांची भेट घेतली होती. यावेळी त्याने इस्रायली सैन्यासोबत छायाचित्रे काढली होती. या चित्रात इस्रायली गणवेश घातलेल्या रोईचा समावेश होता.
आरोपपत्रात म्हटले आहे की रोई ७ ऑक्टोबरला दक्षिण इस्रायलला गेला आणि त्याने स्वत:ला टॉप लेव्हल दहशतवादविरोधी युनिटचा भाग असल्याचे सांगितले. तो बॉम्ब निकामी करण्यात तज् असून शिन बेट अंतर्गत सुरक्षा सेवेचा सदस्य असल्याचेही त्याने सांगितले. १७ डिसेंबरला पोलिसांनी रोईला अटक केली. त्याच्या ताब्यातून मोठ्या प्रमाणात शस्त्रे, ग्रेनेड, मॅगझिन, वॉकीटॉकी, ड्रोन, सैन्याचा गणवेश आणि इतर अनेक उपकरणे जप्त करण्यात आली आहेत. शस्त्र चोरी प्रकरणी पोलिसांनी एका पोलीस अधिकाऱ्यासह अन्य चार जणांना ताब्यात घेतले आहे. दरम्यान, इस्रायलच्या रक्षणासाठी युद्ध लढल्याचे सांगत रोईचे वकिल त्याचा बचाव करण्याचा प्रयत्न करत आहेत.