मोठी किंमत मोजावी लागेल..!! इस्रायलवर मिसाईल हल्ल्यानंतर पंतप्रधान नेतान्याहूंचा इशारा
By ऑनलाइन लोकमत | Published: September 15, 2024 07:03 PM2024-09-15T19:03:49+5:302024-09-15T19:04:41+5:30
Israel PM warning Houthi Rebels after Missile attack: हुथी बंडखोरांनी इस्रायलवर मिसाइल्स डागली, तेव्हापासून इस्रायल यासंदर्भात 'अलर्ट मोड'वर आहे
Israel PM warning Houthi Rebels after Missile attack: इराण पुरस्कृत येमेनच्या हुथी बंडखोरांनी रविवारी सकाळी इस्रायलवर क्षेपणास्त्र हल्ले केले. हुथी बंडखोरांनी इस्त्रायली हवाई संरक्षण क्षेत्रात घुसण्याची ही तिसरी वेळ होती. तेल अवीव शहरात आणि बेन शेमेन जंगलात हा हल्ला करण्यात आला. या क्षेपणास्त्र हल्ल्यानंतर इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांनी हुथी बंडखोरांना कडक शब्दांत इशारा दिला आहे.
पंतप्रधानांनी दिला इशारा
बेंजामिन नेतन्याहू यांनी या हल्ल्यासंदर्भात मंत्रिमंडळाची बैठक बोलावली आहे. तत्पूर्वी नेतन्याहू यांनी एका निवेदनात म्हटले की, आज सकाळी हुथींनी येमेनमधून जमिनीवर मारा करणारे क्षेपणास्त्र आमच्या हद्दीत डागले. आम्हाला हानी पोहोचवण्याच्या त्यांच्या प्रयत्नासाठी आता त्यांना मोठी किंमत मोजावी लागेल, हे त्यांना आत्तापर्यंत कळायला हवे होते.
हुथी बंडखोरांनी हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली
येमेनमधील हुथी बंडखोरांनी रविवारी सकाळी इस्रायलवर जमिनीवर मारा करणारी अनेक क्षेपणास्त्रे डागली. इस्रायलमध्ये स्थापित हवाई संरक्षण यंत्रणेच्या अलर्टनंतर, सायरन वाजण्यास सुरुवात झाली. त्याचा आवाज तेल अवीवपर्यंत ऐकू आला. हुथी लष्करी बंडखोरांचे प्रवक्ते याह्या सारी यांनी बॅलेस्टिक क्षेपणास्त्र हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली.
कोणतीही दुखापत नाही
इस्रायल टाईम्सच्या वृत्तानुसार, हुथी बंडखोरांच्या संघटनेचा अधिकारी नसर अल-दिन आमेर यांनी सांगितले की, या हल्ल्यावरून हे दिसून आले की इस्रायलची संरक्षण व्यवस्था हवाई हल्ल्यासाठी खुली होती. पण या हल्ल्यात कोणालाही इजा झालेली नाही असे सांगण्यात येत आहे. आयडीएफने सांगितले की, क्षेपणास्त्र एका खुल्या भागात आदळले, त्यामुळे कोणालाही दुखापत झाल्याचे कोणतेही वृत्त नाही.