7 दिवसांचा युद्धविराम संपला; इस्रायलने पुन्हा गाझावर केली कारवाई, हवाई हल्ल्यांचा पाऊस
By ऑनलाइन लोकमत | Published: December 1, 2023 06:07 PM2023-12-01T18:07:40+5:302023-12-01T18:07:49+5:30
Israel Hamas War Update: सात दिवसांच्या युद्धविरामात हमासने 105 तर इस्रायलने 240 लोकांची सुटका केली.
Israel Hamas War Update: इस्रायल आणि हमास यांच्यातील सात दिवसांचा युद्धविराम शुक्रवारी सकाळी संपल्यानंतर पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांच्या इस्रायली लष्कराने पुन्हा एकदा गाझामध्ये कारवाई सुरू केली आहे. 24 नोव्हेंबरपासून सात दिवसांच्या युद्धविरामाला सुरुवात झाली होता. यात दोनवेळा मुदतवाढही देण्यात आली. या काळात गाझामध्ये ठेवलेले 105 ओलिस आणि इस्रायली तुरुंगातील 240 पॅलेस्टिनी कैद्यांची सुटका करण्यात आली.
इस्रायल डिफेन्स फोर्सेस (आयडीएफ) ने ट्विटरवर एका पोस्टमध्ये म्हटले आहे की, हमासने युद्धविरामाचे उल्लंघन केले आणि इस्रायली क्षेत्राकडे गोळीबार केला. त्यामुळे आयडीएफने गाझामधील हमास दहशतवादी संघटनेविरुद्ध पुन्हा लढाई सुरू केली आहे. गुरुवारी युद्धविराम एक दिवसासाठी वाढवला होता. शुक्रवारी स्थानिक वेळेनुसार सकाळी सातच्या सुमारास युद्धविराम संपला.
हमासने टेलिग्रामवर दिले अपडेट
मीडिया रिपोर्ट्सनुसार, हमासच्या अंतर्गत आणि राष्ट्रीय सुरक्षा मंत्रालयाने आपल्या टेलिग्राम अकाउंवरुन सांगितले की, दक्षिण गाझा पट्टीवर अनेक हवाई हल्ले झाले आहेत. इस्त्रायली विमाने गाझाच्या आकाशात फिरत आहेत. दुसरीकडे, इस्रायली अधिकार्यांनी वारंवार सांगितले आहे की, युद्धविराम वाढवण्याची अट अशी आहे की, हमासला दररोज ओलीस ठेवलेल्या 10 इस्रायली महिला आणि मुलांची सुटका करावी लागेल. कराराच्या अटींनुसार, इस्रायलने सोडलेल्या प्रत्येक इस्रायली ओलीसामागे तीन पॅलेस्टिनींची सुटका केली जाईल. आता हा युद्धविराम वाढणार की, युद्ध सुरू राहणार, हे येणाऱ्या काळात कळेल.