इस्रायलचा गाझा शहरातील शाळेवर हल्ला, ८० जण ठार; पॅलेस्टिनी आराेग्य विभागाचा दावा
By ऑनलाइन लोकमत | Published: August 11, 2024 01:45 PM2024-08-11T13:45:44+5:302024-08-11T13:47:14+5:30
हल्ल्यात ४७ जण जखमी, मागील महिन्यापासून शाळांवर १७ हल्ले
देर अल-बालाह: इस्रायलने गाझा शहरातील एका शाळेवर शनिवारी पहाटे केलेल्या क्षेपणास्त्र हल्ल्यात सुमारे ८० लोक ठार झाले, असा दावा पॅलेस्टाइनच्या आरोग्य अधिकाऱ्यांनी केला आहे. शाळेची वास्तू निवारा केंद्र म्हणूनही वापरली जात होती. गेल्या दहा महिन्यांत इस्रायल व हमासमध्ये सुरू असलेल्या संघर्षातील भीषण हल्ल्यांपैकी हा एक होता.
गाझा शहरातील ताबीन या शाळेवर इस्रायलच्या लष्कराने हा हल्ला केला. त्या शाळेत हमासचे कमांड सेंटर चालविण्यात येत होते, असा दावा इस्रायलने केला आहे. इस्रायलकडून गाझातील शाळांना काही दिवसांत लक्ष्य केले आहे. शनिवारी पहाटे झालेल्या हल्ल्यात शाळेची इमारत काही वेळातच उद्ध्वस्त झाली.
गाझातील अल्-अहली रुग्णालयाचे संचालक फदले नईम यांनी सांगितले की, या शाळेवर झालेल्या हल्ल्यातील सत्तरहून अधिक लोकांचे मृतदेह हाती लागले आहेत. उद्ध्वस्त शाळेच्या ढिगाऱ्याखाली अजून कोणी अडकले आहे का किंवा मृतदेह आढळतात का, याचा शोध सुरू आहे. त्या हल्ल्यात ४७ जण जखमी झाले आहेत. (वृत्तसंस्था)
मागील महिन्यापासून शाळांवर १७ हल्ले
- गाझा येथे शनिवारी हल्ला झालेल्या शाळेच्या इमारतीत सहा हजार विस्थापितांनी आश्रय घेतला आहे. हमास व इस्रायलमध्ये सुरू असलेल्या युद्धामुळे हजारो लोक विस्थापित झाले आहेत.
- मागील महिन्यापासून इस्रायलने गाझातील शाळांवर १७ हल्ले केले. त्यातील सात हल्ले गेल्या आठ दिवसांत करण्यात आले आहेत. त्यात १६३ जणांचा मृत्यू झाला. मृतांमध्ये महिला, बालकांचा समावेश आहे.
- गाझातील शाळांना लक्ष्य केल्याने जगभरातील मानवी हक्क संघटनांनी या हल्ल्यांचा तीव्र शब्दांत निषेध केला आहे. या क्रूर हल्ल्याचे व्हिडीओ सोशल मीडियात व्हायरल करण्यात येत आहेत. मानवी हक्क संघटनांनी देशात सुरु असलेला हा नरसंहार थांबवावा, अशी मागणी केली आहे.