इस्रायलच्या हल्ल्यात गाझामध्ये ६० जण ठार; मृतांमध्ये महिला आणि लहान मुलांचे प्रमाण अधिक
By ऑनलाइन लोकमत | Published: October 30, 2024 05:39 AM2024-10-30T05:39:37+5:302024-10-30T06:55:00+5:30
इस्रायलविरोधातील संघर्षात विजय मिळेपर्यंत नसरल्लाहच्या धोरणांनुसारच हिजबुल्लाह काम करत राहील, असे त्या संघटनेने सांगितले.
देर अल-बालाह : गाझा पट्टीच्या उत्तर भागात विस्थापित पॅलेस्टिनी नागरिकांनी आश्रय घेतलेल्या पाच मजली इमारतीवर इस्रायलने मंगळवारी पहाटे केलेल्या हल्ल्यात सुमारे ६० लोकांचा मृत्यू झाला. त्यामध्ये महिला आणि मुले यांचे निम्मे प्रमाण आहे. ही माहिती गाझाच्या आरोग्य खात्याने दिली.
गेल्या महिन्यात इस्रायली हवाई हल्ल्यात मारला गेलेला हिजबुल्लाह या संघटनेचा नेता हसन नसरल्लाह याच्यानंतर त्या पदावर शेख नइम कासीमची निवड करण्यात आली आहे. इस्रायलविरोधातील संघर्षात विजय मिळेपर्यंत नसरल्लाहच्या धोरणांनुसारच हिजबुल्लाह काम करत राहील, असे त्या संघटनेने सांगितले.
पॅलेस्टिनी निर्वासितांच्या मदतीसाठी यूएनआरडब्ल्यूए या संघटनेला पॅलेस्टाइन भूमीतून काम करण्यास मज्जाव करणारा कायदा इस्रायलच्या संसदेने नुकताच मंजूर केला आहे.
अतिरेक्यांशी संबंध?
मदत करणाऱ्या संघटनेने दहशतवाद्यांशी हातमिळवणी केल्याचा आरोप इस्रायलकडून केला जातो. याचा संघटनेने इन्कार केला.
युवकांना मारण्यासाठी इस्रायलने नवीन मार्ग शोधला आहे, असा आरोप यूएनआरडब्ल्यूएने केला.
‘सुरूच ठेवणार’
हिजबुल्लाने निवेदनात म्हटले आहे की, इस्रायलशी यापुढेही संघर्ष सुरूच ठेवण्याचे ठरविले आहे. १९८२ साली स्थापन झालेल्या हिजबुल्लाचा संस्थापक सदस्य असलेल्या शेख नइम कासीमची आता या संघटनेचा मुख्य नेता म्हणून निवड झाली आहे.