महायुद्धाची चाहूल! ईद प्रसंगी इस्रायलची इराणला आत घुसून मारायची धमकी; राफावर हल्ला करण्याची तयारीही पूर्ण
By ऑनलाइन लोकमत | Published: April 10, 2024 08:24 PM2024-04-10T20:24:22+5:302024-04-10T20:25:08+5:30
...मात्र, अद्यापही हे रक्तरंजित युद्ध थांबण्याची चिन्हे नाहीत. उलटपक्षी आता या युद्धाचा विस्तार होण्याची भीतीच वाढताना दिसत आहे. कारण ईद प्रसंगी इस्रायलने इराणला मोठी धमकी दिली आहे.
इस्रायल आणि पॅलेस्टाईन यांच्यात गेल्या 6 महिन्यांपासून सुरू असलेल्या युद्धात आतापर्यंत तब्बल 33 हजार निष्पाप नागरिक मारले गेले आहेत. तर इस्रायललाही जवळपास दीड हजार लोकांना गमवावे लागले आहे. मात्र, अद्यापही हे रक्तरंजित युद्ध थांबण्याची चिन्हे नाहीत. उलटपक्षी आता या युद्धाचा विस्तार होण्याची भीतीच वाढताना दिसत आहे. कारण ईद प्रसंगी इस्रायलने इराणला मोठी धमकी दिली आहे. "जर आपल्या भूमीवरून हल्ला झाला, तर त्याला चोख प्रत्युत्तर दिले जाईल. आम्हीही घुसून हल्ला करू," असे इस्रायलचे म्हणणे आहे.
इस्रायलने काही दिवसांपूर्वी सीरियातील इराणच्या वाणिज्य दूतावासावर हवाई हल्ला केला होता. या हल्ल्यात इराणच्या सर्वोच्च जनरलसह अनेक लोक मारले गेले. या हल्ल्यानंतर इराण संतापला असून त्याने अमेरिकेलाही या प्रकरणापासून दूर राहण्यास सांगितले असून आता आम्ही इस्रायलवर हल्ला करणार. याची वेळही आम्हीच ठरवणार, असे म्हटले आहे. यावर इस्रायलने म्हटले आहे, 'जर इराणने त्यांच्या भूमीवरून हल्ला केला तर इस्रायल प्रत्युत्तर देईल आणि इराणमध्ये हल्ला होईल.' इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्लाह अली खामेनी यांनी बुधवारीही म्हटले आहे की, आम्ही वचन देतो की, इस्रायलवर हल्ला होणार. सीरियातील आमच्या वाणिज्य दूतावासावर झालेल्या हल्ल्याचा बदला आम्ही घेणार.
इस्रायल राफावर हल्ल्यासाठी तयार -
गाझातील रफाह शहरावरही इस्रायल हल्ला करण्याच्या तयारीत आहे. इस्रायलचे म्हणणे आहे की, हमासच्या दहशतवाद्यांनी येथे आपले अड्डे तयार केले आहेत आणि तेथेच ज्यू बंधकांनाही ठेवले आहे. इस्त्रायलने रफाहमधून नागरिकांना बाहेर काढण्याची योजनाही तयार केली असून त्यासाठी 40 हजार तंबूही मागवले आहेत.