इस्रायलनं काही तासांतच केलं युद्धविरामाचं उल्लंघन? लेबनानमध्ये हिजबुल्लाहच्या ठिकाणावर केला मोठा हवाई हल्ला
By ऑनलाइन लोकमत | Published: November 29, 2024 12:20 AM2024-11-29T00:20:40+5:302024-11-29T00:21:32+5:30
लष्कराने याला स्व-संरक्षणाची कृती म्हटले असून हिजबुल्लाहकडून इस्रायलच्या सुरक्षेला धोका निर्माण करण्याचा प्रयत्न केला जात होता, असे म्हटले आहे.
इस्रायली लष्कराने दक्षिण लेबनॉनमधील हिजबुल्लाहच्या ठिकाणावर मोठा हवाई हल्ला केला आहे. बुधवारी सकाळपासूनच इस्रायल आणि हिजबुल्ला यांच्यात युद्धविराम सुरू असताना, हा हल्ला करण्यात आला आहे. इस्रायली लष्कराने दिलेल्या माहितीनुसार, हिजबुल्लाह ज्या ठिकाणी मध्यम पल्ल्याच्या रॉकेटचा साठा करत होते, त्याच ठिकाणी हा हवाई हल्ला करण्यात आला. लष्कराने याला स्व-संरक्षणाची कृती म्हटले असून हिजबुल्लाहकडून इस्रायलच्या सुरक्षेला धोका निर्माण करण्याचा प्रयत्न केला जात होता, असे म्हटले आहे.
युद्धविरामावर प्रश्नचिन्ह -
हा हल्ला युद्धबंदीच्या काही तासांनंतर झाला असून, इस्रायलने कराराचे उल्लंघन केले आहे का, असा प्रश्न निर्माण झाला आहे. मात्र, हिजबुल्लाच्या आक्रमक कारवायांना प्रत्युत्तर म्हणून ही कारवाई केल्याचा दावा इस्रायली अधिकाऱ्यांनी केला आहे.
लेबनीज लोकांमध्ये भीतीचे वातावरण-
एपीच्या वृत्तानुसार, 60 दिवसांपेक्षाही अधिक काळ चाललेल्या इस्रायली हल्ल्यांमुळे लेबनॉनमध्ये मोठ्या प्रमाणात विध्वंस झाला आहे. राजधानी बेरूतपासून ते दक्षिणेकडील टायरपर्यंत इस्त्रायने जबरदस्त हल्ले केले आहेत. युद्धबंदीनंतर लेबनीज लोक आता आपापल्या घरी परतत आहेत. मात्र, नुकत्याच झालेल्या या हल्ल्यानंतर पुन्हा एकदा त्यांच्या मनात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
हिजबुल्लाचा गड मानल्या जाणाऱ्या बेरूतच्या दक्षिणी उपनगरातील दहियेहमध्ये संपूर्ण ब्लॉक्स नष्ट झाले आहेत. उंच इमारती तुटून आता त्या ठिकाणी काँक्रीटचा ढिगारा झाला आहेत.