गाझातील रफाह शहर रिकामे करण्याचा इस्रायलचा इशारा, हमासविरुद्ध मोठ्या आक्रमणाचे संकेत

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 1, 2025 10:50 IST2025-04-01T10:50:11+5:302025-04-01T10:50:46+5:30

Israel-Hamas war : गाझा पट्टीत दक्षिणेकडील सर्वांत मोठे रफाह शहर तातडीने रिकामे करावे, असे आदेश इस्रायलच्या लष्कराने सोमवारी दिले. हमासविरुद्ध नवीन मोठे अभियान सुरू करण्याचे हे संकेत मानले जात आहेत.

Israel warns of evacuating Rafah city in Gaza, hints at major offensive against Hamas | गाझातील रफाह शहर रिकामे करण्याचा इस्रायलचा इशारा, हमासविरुद्ध मोठ्या आक्रमणाचे संकेत

गाझातील रफाह शहर रिकामे करण्याचा इस्रायलचा इशारा, हमासविरुद्ध मोठ्या आक्रमणाचे संकेत

दीर अल-बला : गाझा पट्टीत दक्षिणेकडील सर्वांत मोठे रफाह शहर तातडीने रिकामे करावे, असे आदेश इस्रायलच्या लष्कराने सोमवारी दिले. हमासविरुद्ध नवीन मोठे अभियान सुरू करण्याचे हे संकेत मानले जात आहेत. या महिन्याच्या प्रारंभी इस्रायल व हमासदरम्यान झालेल्या युद्धबंदी कराराची मुदत संपताच इस्रायलने या गाझा भागात पुन्हा जोरदार हल्ले सुरू केले असून, जमिनीवरून थेट युद्ध सुरू केले आहे. 

मार्चच्या प्रारंभीच इस्रायलने या भागात २० लाख पॅलेस्टिनींचा अन्न, इंधन, औषधांचा पुरवठा बंद केला होता. या माध्यमातून हमासवर युद्धबंदी करारातील काही बदल स्वीकारण्यासाठी दबाव टाकण्याचा इस्रायलचा प्रयत्न असून, रफाह शहरासह सर्व भाग रिकामा करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. डोनाल्ड ट्रम्प यांच्या प्रस्तावाची या माध्यमातून अंमलबजावणी केली जाईल, असे त्यांनी नमूद केले.

इजिप्त सीमेवरही ताबा
गेल्या मे महिन्यात इस्रायलने असेच आक्रमक अभियान राबवून इजिप्त सीमेसह रफाह क्रॉसिंगवर ताबा मिळवला होता. गाझात प्रवेश करण्याच्या दृष्टीने इतर कोणत्याही देशांसाठी हे एक प्रवेशद्वार आहे. जानेवारीत हमासशी केलेल्या युद्धबंदी करारानुसार इस्रायलने या भागातून आपले सैनिक काढून घेणे अपेक्षित होते. परंतु, याच भागातून शस्त्रास्त्रांची तस्करी होत असल्याचा आरोप करीत इस्रायली सैन्य या भागात तळ ठोकून राहिले. 

पॅलेस्टिनी जाणार कुठे?
इस्रायलने या पॅलेस्टिनी नागरिकांना मुवासीच्या दिशेने जाण्याचे आदेश दिले असून, हा एक तात्पुरत्या तंबूंचा निवासी परिसर आहे. नेमक्या ईदच्या पार्श्वभूमीवर इस्रायली लष्कराने हे आदेश दिले आहेत.

५९ ओलिसांचा प्रश्न
इस्रायलने हमासच्या ताब्यातील आपल्या ५९ ओलिसांच्या सुटकेसाठी आग्रही भूमिका घेतली आहे. या ओलिसांपैकी २४ जण जिवंत असल्याचा अंदाज असून, कोणत्याही परिस्थितीत हमासने शस्त्रे टाकून रफाहसह इतर भूभाग सोडावा, असे इस्रायलने बजावले आहे. 
इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेत्यान्याहू यांनी युद्धानंतर गाझातील सुरक्षेची जबाबदारी इस्रायल घेईल तसेच या भागातील लोकांना इतर देशांत वास्तव्याची व्यवस्था करेल, असे म्हटले आहे. डोनाल्ड ट्रम्प यांच्या प्रस्तावाची या माध्यमातून अंमलबजावणी केली जाईल, असे त्यांनी नमूद केले.

Web Title: Israel warns of evacuating Rafah city in Gaza, hints at major offensive against Hamas

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.