भीषण! गाझामधील शाळेवर इस्रायलचा एअर स्ट्राईक; लहान मुलांसह २० जणांचा मृत्यू, अनेक जखमी
By ऑनलाइन लोकमत | Published: October 14, 2024 09:36 AM2024-10-14T09:36:22+5:302024-10-14T09:41:01+5:30
इस्रायलने गाझामध्ये पुन्हा एकदा एअर स्ट्राईक केला आहे.
इस्रायलने गाझामध्ये पुन्हा एकदा एअर स्ट्राईक केला आहे. स्थानिक रुग्णालयांच्या म्हणण्यानुसार, मध्य गाझामधील आश्रयस्थान असलेल्या एका शाळेत इस्रायलने केलेल्या या एअर स्ट्राईकमध्ये लहान मुलांसह जवळपास २० जणांचा मृत्यू झाला आहे. तर अनेक जण जखमी झाले आहेत.
रविवारी रात्री झालेल्या हल्ल्यात नुसेरातमध्ये दोन महिलांचाही मृत्यू झाला. गाझामध्ये वर्षभर चाललेल्या युद्धामुळे विस्थापित झालेले अनेक पॅलेस्टिनी या शाळेत राहत होते. मृतदेह नुसरतमधील अल-अवदा रुग्णालयात आणि देइर अल-बलाह येथील अल-अक्सा शहीद रुग्णालयात नेण्यात आले आहेत.
गाझाच्या आरोग्य मंत्रालयाच्या म्हणण्यानुसार, इस्रायलच्या बॉम्बहल्ला आणि गाझावर केलेल्या हल्ल्यात ४२००० हून अधिक पॅलेस्टिनी ठार झाले आहेत. इस्रायल हल्ल्यांदरम्यान अधिक नुकसान होत आहे.
इस्त्रायल आणि हमास यांच्यात सुरू असलेल्या युद्धाला आता एक वर्ष पूर्ण झालं असून आता अनेक आघाड्यांवर लढा सुरू आहे. एकीकडे इस्रायल हमासच्या विरोधात कारवाई करत आहे, तर दुसरीकडे लेबनानमध्ये इराणसमर्थित हिजबुल्लाहविरोधातही त्यांची मोहीम सुरू आहे. इराणनेही इस्रायलवर मिसाईल अटॅक केला आहे.
इस्रायलने १ ऑक्टोबर रोजी दक्षिण लेबनानमध्ये हिजबुल्लाहच्या विरोधात ग्राऊंड ऑपरेशन सुरू केलं. या युद्धादरम्यान दोन्ही बाजू एकमेकांवर हवाई आणि रॉकेट हल्लेही करत आहेत. इस्रायली हवाई हल्ल्यात लेबनानमध्ये मृतांची संख्या २ हजारांपेक्षा जास्त झाली आहे, परंतु असं असतानाही लेबनानमध्ये हिजबुल्लाहचे सैनिक इस्रायली सैनिकांशी भिडत आहेत.
हिजबुल्लाहचा इस्रायलवर मोठा हल्ला
शनिवारी हिजबुल्लाहने इस्रायलवर जोरदार हल्ला चढवला. इराण समर्थित हिजबुल्लाहने इस्रायलवर सुसाईड ड्रोन आणि मिसाईल हल्ले केले आहेत, ज्यामध्ये चार इस्रायली सैनिकांचा मृत्यू झाला आणि अनेक जण गंभीर जखमी झाले आहेत.
हिजबुल्लाहने बिन्यामिना येथील लष्करी तळावर हल्ला केला. इस्रायलवरील हिजबुल्लाहने केलेला हा हल्ला आतापर्यंतचा सर्वात प्राणघातक हल्ला मानला जात आहे. या हल्ल्यात इस्रायलमध्ये आतापर्यंत ६७ जण जखमी झाले असून, यातील अनेकांची प्रकृती गंभीर असल्याचं सांगितलं जात आहे.