गाझातील हॉस्पिटलवर इस्रायलचा हवाई हल्ला; 500 जणांचा मृत्यू, जॉर्डनने बायडेन यांचा दौरा रद्द केला
By ऑनलाइन लोकमत | Published: October 18, 2023 06:08 AM2023-10-18T06:08:19+5:302023-10-18T06:08:39+5:30
इस्रायलसाठी बायडेन युद्धभूमीत, युद्ध निवळण्याची शक्यता; रशियाचा शस्रसंधीचा प्रस्ताव संयुक्त राष्ट्रात फेटाळला
गाझा शहरातील हॉस्पिटलवर इस्रायलने केलेल्या हवाई हल्ल्यात किमान 500 लोक ठार झाले आहेत. हल्ल्याच्या वेळी शेकडो लोक अल-अहली रुग्णालयात आश्रय घेत होते. या घटनेचा हमासने वॉर क्राईम असा उल्लेख करत जगातील देशांची सहानुभूती मिळविण्याचा प्रयत्न सुरु केला आहे. तर इस्रायलने तो हल्ला आपण केलेला नसून हमासनेच ऱॉकेट डागल्याचे म्हटले आहे.
दुसरीकडे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन हे जॉर्डन दौऱ्यावर जाणार आहेत. परंतू, त्यापूर्वीच त्यांनी इस्रायलला भेट देणार असल्याचे जाहीर केले आहे. या पार्श्वभूमीवर जॉर्डनने बायडेन यांच्यासोबतची बैठक रद्द केली आहे. दहशतवादी संघटना हमासच्या हल्ल्यानंतर इस्रायलला पाठिंबा देण्यासाठी, पुढे काय पावले उचलावीत, यावर चर्चा करण्यासाठी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन बुधवारी इस्रायलला भेट देणार असल्याची माहिती व्हाइट हाउसने दिली. दुसरीकडे इस्रायल-हमास संघर्षाबद्दल रशियाने संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा परिषदेमध्ये मांडलेला शस्त्रसंधीचा प्रस्ताव फेटाळण्यात आला. या प्रस्तावामध्ये रशियाने हमासच्या हल्ल्यांचा उल्लेख न करण्याचा खोडसाळपणा केला होता.
दरम्यान, इस्रायल-हमास युद्धाच्या ११ व्या दिवशीही दक्षिण गाझामध्ये तीव्र बॉम्बवर्षाव सुरूच आहे. सततच्या हल्ल्यांमुळे गाझामधील जनजीवन विस्कळीत झाले आहे. गाझातून पळून जाण्याचा प्रयत्न करणारे हजारो लोक रफाह येथे जमले आहेत. तेथून इजिप्तला जाणारा मार्ग आहे. परदेशी पासपोर्ट असलेल्या निर्वासितांना मदत करण्यासाठी आणि बाहेर पडण्यासाठी मध्यस्थ करारासाठी दबाव आणत आहेत.
कुणाचे समर्थन? चीन, गॅबॉन, मोझांबिक, रशिया, यूएई
कुणाचा विरोध? फ्रान्स, जपान, ब्रिटन, अमेरिका
इस्रायल, लेबनॉन सीमेवर संघर्ष
लेबनॉन आणि इस्रायलच्या सीमेवर मंगळवारी पुन्हा संघर्ष सुरू झाला. मंगळवारी सकाळी लेबनॉनने उडवलेले रणगाडाविरोधी क्षेपणास्त्र उत्तर इस्रायलमधील मेतुला येथे पडले आणि तीन जण जखमी झाले.
हमासची क्रूरता व्हायरल
हमासने इस्रायली नागरिकांची अतिशय क्रूरपणे हत्या केली. त्याची भीषणता दाखविणारा व्हिडीओ इस्रायलने जारी केला. त्यात हमासने एका बालकाला जिवंत जाळले, एकाचा शिरच्छेद करत होते, असे व्हिडीओत दाखवले आहे.
मदतीसाठी १३ हजार स्वयंसेवक
पॅलेस्टिनीमधील निर्वासितांच्या मदतीसाठी युनायडेट नेशन्स रिलिफ अँड वर्क्स एजन्सी (यूएनआरडब्ल्यूए) या संस्थेचे सुमारे १३ हजार स्वयंसेवक सध्या गाझा परिसरात सक्रिय आहेत. त्यात डॉक्टर, शिक्षक, नर्स आदींचा समावेश आहे.
हमासच्या कमांडरचा खात्मा
इस्रायलने मंगळवारी हमासच्या आणखी एका कमांडरचा खात्मा केल्याची माहिती इस्रायलच्या संरक्षण विभागाने दिली. अयमान नोफाल असे त्याचे नाव असून तो सेंट्रल ब्रिगेडचा कमांडर तसेच लष्करी गुप्तचर विभागाचा प्रमुख होता.