हमासने वापरलेल्या दोन बँकांवर इस्रायलचा हवाई हल्ला; गाझा पट्टीतील अनेक ठिकाणं उद्धवस्त

By ऑनलाइन लोकमत | Published: October 11, 2023 02:36 PM2023-10-11T14:36:00+5:302023-10-11T14:40:23+5:30

इस्रायलने गाझाला पूर्णपणे वेढा घातला असून अन्न, पाणी, इंधन आणि जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा पूर्णपणे बंद करण्यात आला आहे.

Israeli airstrikes on two banks used by Hamas; Many places in the Gaza Strip are in chaos | हमासने वापरलेल्या दोन बँकांवर इस्रायलचा हवाई हल्ला; गाझा पट्टीतील अनेक ठिकाणं उद्धवस्त

हमासने वापरलेल्या दोन बँकांवर इस्रायलचा हवाई हल्ला; गाझा पट्टीतील अनेक ठिकाणं उद्धवस्त

इस्रायल आणि हमास या दहशतवादी संघटना यांच्यात भीषण युद्ध सुरू आहे. इस्रायलने गाझा पट्टीतील हमासच्या ठिकाणांवर बॉम्बफेक सुरूच ठेवली आहे. इस्रायलने आतापर्यंत हमासच्या २२०० हून अधिक ठिकाणांना टार्गेट केलं आहे. इस्त्रायली सैन्याने आपल्या भागात १५०० दहशतवाद्यांचा खात्मा केला आहे.

इस्रायलने गाझाला पूर्णपणे वेढा घातला असून अन्न, पाणी, इंधन आणि जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा पूर्णपणे बंद करण्यात आला आहे. हमासच्या दहशतवाद्यांचा शोध घेण्यासाठी इस्रायली सैनिक गाझामध्ये छापे टाकत आहेत. हमासच्या हल्ल्यात १ हजाराहून अधिक इस्रायली लोकांचा मृत्यू झाला आहे, तर अनेकांचे अपहरणही झाले आहे. शहीद झालेल्यांमध्ये १५६ लष्करी जवानांचाही समावेश आहे.

इस्रायली वायुसेनेने हल्ल्याबाबत एक मोठे अपडेट दिले आहे. IAF (इस्रायली हवाई दल) ने अहवाल दिला की लढाऊ विमानांनी गाझा पट्टीच्या बीट हानौनमध्ये ८० हून अधिक ठिकाणांवर हल्ला केला. यामध्ये गाझामधील दहशतवादाला वित्तपुरवठा करण्यासाठी हमासने वापरलेल्या दोन बँकांचाही समावेश आहे. इस्त्रायली प्रतिहल्ल्याने हमासद्वारे दहशतवादी कारवायांसाठी वापरल्या जाणार्‍या दोन ऑपरेशनल कमांड सेंटरलाही फटका बसला असल्याचे सांगण्यात येत आहे. 

नागरिकांच्या मदतीसाठी धावाधाव

मानवतावादी गट इस्रायल आणि हमास यांच्यातील युद्धात अडकलेल्या नागरिकांना मदत करण्यासाठी, त्यांना सुरक्षित ठेवण्यासाठी झटत आहेत; परंतु, गाझाच्या तीव्र नाकेबंदीमुळे व लढाईमुळे ते गुंतागुंतीचे होत आहे. इजिप्तच्या रेड क्रॉस संघटनेकडून दाेन टनापेक्षा जास्त वैद्यकीय पुरवठा गाझाला पाठविण्यात आला आहे. अन्न आणि इतर वितरण आयोजित करण्याचे प्रयत्न सुरू आहेत.

कैद्यांच्या सुटकेसाठी ओलिसांचा वापर

हमासच्या वरिष्ठ कमांडरने म्हटले की, गाझामधील विध्वंसक युद्ध सुरू राहिल्यास इराण आणि हिजबुल्लासारखे मित्र या लढाईत मदतीला येतील. २०१४ च्या युद्धापासून हमास स्वतःचे रॉकेट आणि प्रशिक्षित सैनिक तयार करत आहे. ओलिस ठेवलेल्या शेकडो इस्रायलींचा वापर इस्रायली आणि  सर्व अरब तसेच पॅलेस्टिनी कैद्यांच्या सुटकेसाठी करेल, असेही ते म्हणाले.

इस्रायलच्या बाजूने कोणते देश उतरले? 

युद्धात इस्रायलला पाठिंबा देण्यासाठी ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक यांच्यासह अमेरिका, फ्रान्स, जर्मनी, इटली हे देश एकत्र आले आहेत. या देशांच्या पंतप्रधानांनी एकत्र येत युद्धाबाबत चर्चा केली. दहशतवादाला कधीही समर्थन नाही, असे या देशांनी संयुक्त निवेदनात म्हटले आहे. 

Web Title: Israeli airstrikes on two banks used by Hamas; Many places in the Gaza Strip are in chaos

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.