गाझापट्टीत इस्रायली फौजांचा हल्ला
By admin | Published: July 19, 2014 12:24 AM2014-07-19T00:24:43+5:302014-07-19T00:24:43+5:30
हवाई आणि सागरी हल्ल्यानंतर इस्रायलने हमासची सत्ता असलेल्या गाझापट्टीत गुरुवारी रात्रीपासून थेट फौजा घुसवीत चढाई केली.
गाझा/जेरूसलेम : हवाई आणि सागरी हल्ल्यानंतर इस्रायलने हमासची सत्ता असलेल्या गाझापट्टीत गुरुवारी रात्रीपासून थेट फौजा घुसवीत चढाई केली. गाझापट्टीवर जून २००७ पासून कब्जा करणाऱ्या ‘हमास’ला जबर हादरा देण्यासाठी इस्रायलने हवाई आणि सागरी हल्ल्यांसह तोफांसोबत फौज उतरविली आहे. इस्रायलला या हल्ल्याची जबर किंमत चुकवावी लागेल, असा इशारा हमासने दिला आहे.
गेल्या दहा दिवसांतील हवाई हल्ल्यात २६० पॅलेस्टिनी मारले गेले. इस्रायलच्या या जबर हल्ल्यानंतरही हमासच्या गनिमांचे इस्रायलवरील रॉकेट हल्ले थांबलेले नाहीत. हमासचे दहशतवादी जाळे आणि छुपे अड्डे उद्ध्वस्त करण्याच्या उद्देशानेच रणगाड्यासोबत थेट लष्करी मोहीम सुरू करण्यात आली आहे, असे इस्रायली लष्कराने (इस्रायली डिफेन्स फोर्स) स्पष्ट केले आहे. उत्तर गाझापट्टीत गुरुवारी रात्री झालेल्या भीषण गोळीबारानंतर एक इस्रायली सैनिक ठार झाला.
हमासच्या हल्ल्यामुळे निर्माण झालेला तणाव कमी करण्यासाठी आम्ही दिलेला प्रस्ताव हमासने नाकबूल केल्याने गाझापट्टीत फौजा घुसविण्याचा आयडीएफला निर्णय घ्यावा लागला. इस्रायलचे नागरिक दहशतीविना सुखरूप राहावेत, हाच या पायदल कारवाईमागचा उद्देश असल्याचे इस्रायली लष्कराने म्हटले आहे. गुरुवारी इस्रायलने गुरुवारी गाझापट्टीत १८ हजार सैनिक तैनात केले आहेत. ८ जुलैपासून इस्रायलने या कारवाईसाठी ६५ हजारांची फौज तैनात केली आहे. (वृत्तसंस्था)