इस्रायलचा हल्ला, गाझात ८८ जण ठार; अन्न, पाण्यासह औषधांचीही चणचण
By ऑनलाइन लोकमत | Published: October 31, 2024 05:52 AM2024-10-31T05:52:44+5:302024-10-31T05:53:01+5:30
महिला व मुलांचे प्रमाण सर्वाधिक, जखमींची प्रकृती चिंताजनक
देर अल-बालाह : इस्रायलने गाझापट्टीत केलेल्या दोन हल्ल्यांत मरण पावलेल्यांची संख्या ८८वर पोहोचली आहे. त्यामध्ये सर्वाधिक प्रमाण महिला व मुलांचे असल्याचे गाझापट्टीतील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी सांगितले. काही जखमींची प्रकृती चिंताजनक आहे.
उत्तर गाझामध्ये इस्रायलने हमास दहशतवाद्यांच्या अड्ड्यांवर मारा सुरू ठेवला आहे. त्यामुळे तेथील हजारो नागरिकांच्या अडचणी वाढल्या आहेत. पॅलेस्टाइनमध्ये तेथील नागरिकांना अन्न, पाणी व औषधे यांचा पुरवठा करणाऱ्या यूएनआरडब्ल्यूए या संघटनेशी सहकार्य न करण्याचा तसेच या संघटनेवर इस्रायलमध्ये बंदी घालण्याबाबतचे दोन कायदे त्या देशाने नुकतेच मंजूर केले आहेत.
‘इस्रायलला पॅलेस्टिनी नागरिकांना मदत पुरवावी लागेल’
यूएनआरडब्ल्यूए या संघटनेशी असलेला अजिबात सहकार्य न करण्याचा कायदा इस्रायलने अमलात आणल्यास इस्रायलला पॅलेस्टाइनमधील नागरिकांना जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा व अन्य मदत करावी लागेल, असे संयुक्त राष्ट्रांनी म्हटले आहे. युनाेने इस्रायलच्या भुमिकेवर नाराजी व्यक्त केली आहे.