भीषण! गाझातील शाळेवर इस्रायलचा हवाई हल्ला; ११ महिन्यांच्या बाळासह १७ जणांचा मृत्यू
By ऑनलाइन लोकमत | Published: October 24, 2024 06:04 PM2024-10-24T18:04:35+5:302024-10-24T18:05:12+5:30
एका शाळेवर इस्रायलने मोठा हल्ला केला आहे. यामध्ये १७ जणांचा मृत्यू झाला
गाझाच्या नुसरत कॅम्पमध्ये आश्रयासाठी वापरल्या जाणाऱ्या एका शाळेवर इस्रायलने मोठा हल्ला केला आहे. यामध्ये १७ जणांचा मृत्यू झाला. रॉयटर्सच्या वृत्तानुसार, मृत्यू झालेल्यांमध्ये एका ११ महिन्यांच्या बाळाचाही समावेश आहे. रिपोर्टनुसार, ३२ जण जखमी झाले असून, त्यापैकी अनेकांची प्रकृती चिंताजनक आहे.
हजारो विस्थापित कुटुंब राहत असलेल्या शाळेला इस्रायली सैन्याने लक्ष्य करण्याची ही पहिलीच वेळ नाही. शेल्टर होमवर अनेकदा हल्ले झाले आहेत. या हल्ल्यांमध्ये अनेकदा महिला आणि लहान मुलं मारली जातात. गाझाच्या आरोग्य मंत्रालयाच्या म्हणण्यानुसार, ४२००० हून अधिक पॅलेस्टिनी मारले गेले आहेत, ज्यापैकी निम्म्याहून अधिक महिला आणि मुलं आहेत.
रॉयटर्सच्या रिपोर्टनुसार, बुधवारी (२३ ऑक्टोबर २०२४), इस्रायली सैन्याने पत्रकार आणि माजी कैद्यांसह १८ पॅलेस्टिनींना अटक केली. गाझावरील युद्ध सुरू झाल्यापासून अटक करण्यात आलेल्या लोकांची संख्या ११,४०० हून अधिक झाली आहे. सातत्याने होत असलेल्या हल्ल्यांमुळे गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे.