गाझापट्टीवर इस्रायलचा लष्करी हल्ला
By admin | Published: July 14, 2014 12:03 AM2014-07-14T00:03:40+5:302014-07-14T00:03:40+5:30
इस्रायलने प्रथमच गाझापट्टीवर लष्करी हल्ला केला असून, हमासचे रॉकेट हल्ले थांबविण्यासाठी उत्तर गाझापट्टीवर गोळीबार सुरू केला आहे.
जेरूसलेम : इस्रायलने प्रथमच गाझापट्टीवर लष्करी हल्ला केला असून, हमासचे रॉकेट हल्ले थांबविण्यासाठी उत्तर गाझापट्टीवर गोळीबार सुरू केला आहे. या भागात राहणाऱ्या पॅलेस्टिनी नागरिकांनी घरे रिकामी करावीत, कारण या परिसरात जोरदार लढाईला तोंड फुटणार आहे असे इस्रायलने जाहीर केले आहे. गेल्या सहा दिवसांत इस्रायलने पॅलेस्टाईनवर १,३२० हवाई हल्ले केले असून, त्यात १६५ लोक ठार झाले आहेत. गाझापट्टीवरून हजारोंच्या संख्येने नागरिक पलायन करीत आहेत.
जागतिक पातळीवर युद्धबंदी करण्याची आवाहने केली जात आहेत, या आवाहनांकडे दुर्लक्ष करत इस्रायलच्या सैनिकांनी रविवारी पहाटे गाझापट्टीवर प्रवेश केला असून, त्यांनी या परिसरातील क्षेपणास्त्रांचे प्रक्षेपण करण्याच्या केंद्रावर छापा टाकला. इस्रायलचे पायदळ प्रथमच पॅलेस्टाईनच्या विरोधात उतरले असून, गाझापट्टीवर लष्करी हल्ला केल्याची इस्रायलाने कबुली दिली आहे. जवळपास दीड तास चाललेल्या या आक्रमणाअंतर्गत इस्रायलचे काही सैनिक जखमी झाले, पण सर्वजण आपल्या प्रदेशात परत जाण्यात यशस्वी झाले. नंतर इस्रायलच्या विमानांनी उत्तर गाझापट्टीवर पत्रके फेकली असून, त्यात गाझापट्टीवरील रहिवाशांना घरे रिकामी करण्यास सांगितले आहे. गाझा सैन्यातील विशेष प्रशिक्षित कमांडोंनी गाझापट्टीवर रात्री हल्ला चढवला असून, तेथील लांब पल्ल्याचे रॉकेट प्रक्षेपण करणारे केंद्र उद्ध्वस्त करण्यात आले. याच केंद्रातून तेल अवीव व त्यापेक्षाही जास्त दूर उत्तरेकडे रॉकेटचा मारा करण्यात आला होता, असे इस्रायलच्या लष्कराने म्हटले आहे. या कारवाईत इस्रायलचे चार सैनिक जखमी झाले असून, त्यांच्यावर अश्केलान येथील बारझिलाई रुग्णालयात उपचार सुरू आहेत, असे इस्रायल सुरक्षा दलाच्या प्रवक्त्याने सांगितले. इस्रायलने गेल्या २४ तासांत गाझापट्टीवर २०० हवाई हल्ले केले आहेत.
स्थानिक नागरी संस्था व मशिदीवर बॉम्बहल्ले करण्यात आले असून, रॉकेट प्रक्षेपण करणारी ५३ केंद्रे, रॉकेट निर्माण करणारी ११ केंद्रे , हमासचे नऊ कमांड व पाच प्रशिक्षण शिबिरे नष्ट करण्यात आली आहेत. इस्रायली जेटनी ६२ इमारतीवर हल्ला केला आहे. २००७ पासून गाझापट्टीवर ताबा मिळविणाऱ्या हमास संघटनेवर दोषारोप करत इस्रायल मनमानी करत आहे. (वृत्तसंस्था)