"तुम्हाला किंमत चुकवावी लागेल", नेतन्याहूंचा इशारा; इराण म्हणाले, "प्रत्युत्तर दिलं तर..."
By ऑनलाइन लोकमत | Published: October 2, 2024 08:35 AM2024-10-02T08:35:37+5:302024-10-02T08:41:24+5:30
Israeli PM Benjamin Netanyahu : इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांनी इराणच्या क्षेपणास्त्र हल्ल्यानंतर बदला घेण्याची शपथ घेतली आहे.
Iran Attacks Israel : हिजबुल्लाचा प्रमुख नरसल्लाहच्या हत्येनंतर तीन दिवसांनी इराणनेइस्रायलवर मोठा हल्ला केला. मंगळवारी रात्री इराणनेइस्रायलवर शेकडो बॅलेस्टिक क्षेपणास्त्रे डागली. इराणने एकाच वेळी १८१ क्षेपणास्त्रांनी हल्ला केल्याची माहिती समोर आली आहे. मात्र, त्यातील बहुतांश क्षेपणास्त्रेइस्रायलच्या हवाई संरक्षण यंत्रणेने हवेतच नष्ट केली आहेत. या हल्ल्यामुळे आता दोन्ही देशातील वातावरण तापलं असून जागतिक स्तरावर तणावाची परिस्थिती निर्माण झाली होती. इराणच्या हल्ल्यानंतर इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू यांनी मोठं विधान केलं आहे. इराणने मोठी चूक केली असून त्याची किंमत त्यांना चुकवावी लागेल, असं पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू यांनी म्हटलं आहे.
बेरूतच्या दक्षिणेकडील हवाई हल्ल्यात लेबनॉनच्या हिजबुल्ला गटाचा नेता मारला गेला होता. त्यानंतर नेतान्याहू यांनी सोमवारीच इराणला कडक शब्दांत इशारा दिला होता. इराण हिजबुल्ला आणि हमासला मदत करतो. मध्यपूर्वेमध्ये अशी कोणतीही जागा नाही जिथे इस्रायल पोहोचू शकत नाही, असं नेत्यानाहू म्हणाले होते. त्यानंतर मंगळवारी इराणनं जवळपास १८१ हून अधिक बॅलेस्टीक क्षेपणास्त्रांनी इस्रायलवर हल्ला चढवला. या हल्ल्यानंतर इस्रायलमध्ये हाय अलर्ट लागू करण्यात आला आहे.
इराणच्या क्षेपणास्त्र हल्ल्यानंतर इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू यांनी इराणने क्षेपणास्त्र डागून मोठी चूक केली असल्याचे म्हटलं आहे. जेरुसलेममध्ये सुरक्षा मंत्रिमंडळाच्या बैठकीत या हल्ल्याविषयी नेतान्याहू यांनी भाष्य केलं. "इराणला याची किंमत चुकवावी लागेल.संध्याकाळी इस्रायलवरील हल्ला अयशस्वी झाला. जगातील सर्वात प्रगत असलेल्या इस्रायलच्या हवाई संरक्षण यंत्रणेचे आभार मानून आम्ही इराणचा हल्ला हाणून पाडला. इराणमधील राजवटीला आमचा स्वसंरक्षणाचा निश्चय आणि आमच्या शत्रूंचा बदला घेण्याचा आमचा निर्धार समजत नाही," असं पंतप्रधान नेतान्याहू म्हणाले.
इराणच्या सशस्त्र दलाचे चीफ ऑफ स्टाफ मेजर जनरल मोहम्मद बागेरी यांनी इशारा दिला आहे. इराणने केलेल्या क्षेपणास्त्र हल्ल्याला इस्रायलने प्रत्युत्तर दिल्यास, या कारवाईची पुनरावृत्ती अधिक ताकदीने केली जाईल, असं बागेरींनी म्हटलं आहे. इराणचे अध्यक्ष मसूद पेजेश्कियान यांनी इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांना इशारा देत इराण युद्धप्रेमी नसल्याचे म्हटले आहे. "कायदेशीर अधिकारांच्या आधारे आणि इराणच्या शांतता आणि सुरक्षिततेच्या उद्देशाने नेतन्याहू राजवटीच्या आक्रमकतेला निर्णायक प्रत्युत्तर दिले गेले आहे. ही कारवाई इराणचे हित आणि नागरिकांचे रक्षण करण्यासाठी होती. नेतान्याहू यांना माहिती असायला हवं की इराण युद्धप्रेमी नाही, पण तो कोणत्याही धोक्याच्या विरोधात ठामपणे उभा आहे. इराणशी संघर्ष करू नका," असं पेजेश्कियान यांनी म्हटलं आहे.
दरम्यान, लेबनॉन सीमेवर हिजबुल्ला आणि इस्रायल यांच्यात गेल्या काही काळापासून संघर्ष सुरु आहे. गेल्या वर्षी ८ ऑक्टोबर रोजी हमासने आपले सैनिक इस्रायलमध्ये पाठवले आणि त्यानंतर गाझामध्ये भीषण संघर्ष सुरू झाला. त्यादरम्यान सुमारे २५० इस्रायलींना ओलीस ठेवण्यात आले होते. मात्र जेव्हा हिजबुल्लाह प्रमुख हसन नसराल्लाह इस्रायली हल्ल्यात मारला गेला तेव्हा उत्तर लेबनॉन संघर्षाचा केंद्रबिंदू बनला.