इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू पहिल्यांदाच कोर्टात हजर झाले; त्यांच्यावर नेमका काय आरोप?
By ऑनलाइन लोकमत | Published: December 10, 2024 09:26 PM2024-12-10T21:26:09+5:302024-12-10T21:26:34+5:30
इस्रायलच्या पंतप्रधानाने कोर्टात हजर होण्याची पहिलीच वेळ आहे.
तेल अवीव:इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांनी कथित भ्रष्टाचाराच्या आरोपांखाली दीर्घकाळ चाललेल्या खटल्यात मंगळवारी प्रथमच न्यायालयात साक्ष दिली. एकीकडे नेतन्याहू यांना युद्ध गुन्ह्यांसाठी आंतरराष्ट्रीय अटक वॉरंटचा सामना करावा लागतोय, तर दुसरीकडे कोर्टात साक्ष देण्यासाठी हजर रहावे लागतेय. एखाद्या विद्यमान इस्रायली पंतप्रधानाने न्यायालयात हजर राहून साक्ष देण्याची ही पहिलीच वेळ आहे.
काय म्हणाले नेतन्याहू?
मी आठ वर्षे सत्य सांगण्यासाठी या क्षणाची वाट पाहिली, असं नेतन्याहू म्हणाले. शिवाय, आपल्यावरील आरोप खोटे आणि निराधार असल्याचा दावा केला. नेतन्याहू यांनी घटनांचे वर्णन करण्यास सुरुवात केली, तेव्हा ते एकदम शांत दिसले. त्यांनी त्यांच्या आयुष्याविषयी वैयक्तिक माहितीही शेअर केली. मीडिया कव्हरेजमुळे माझी झोप उडायची, परंतु आता त्याचा कोणताही परिणाम होत नाही, असंही ते यावेळी म्हणाले.
नेतान्याहू यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप
बेंजामिन नेतन्याहू यांच्यावर वैयक्तिक आणि व्यावसायिक हितसंबंधांच्या बदल्यात अब्जाधीश हॉलीवूड निर्मात्यांकडून हजारो डॉलर्स किमतीचे सिगार आणि शॅम्पेन स्वीकारल्याचा आरोप आहे. याशिवाय, त्यांच्यावर स्वतःबद्दल सकारात्कम बातम्या दाखवण्यासाठी मीडिया उद्योगपतींसाठी अनुकूल नियम केल्याचाही आरोप आहे. नेतन्याहूंनी यावेळी आरोपांना चुकीचे आणि निराधार म्हटले. तसेच, सरकार पाडण्यासाठी हे कृत्य केल्याचाही आरोप केला.