पॅलेस्टाईनकडून इस्रायलवर रॉकेट हल्ला
By admin | Published: October 11, 2015 03:05 AM2015-10-11T03:05:03+5:302015-10-11T03:05:03+5:30
इस्रायल आणि पॅलेस्टाईनमधील गेले अनेक आठवडे चाललेला तणाव अधिकच वाढीस लागला आहे. या आठवडाभरामध्ये दोन्ही बाजूंकडून झालेल्या चाकू हल्ल्यांच्या घटनांमुळे
जेरुसलेम : इस्रायल आणि पॅलेस्टाईनमधील गेले अनेक आठवडे चाललेला तणाव अधिकच वाढीस लागला आहे. या आठवडाभरामध्ये दोन्ही बाजूंकडून झालेल्या चाकू हल्ल्यांच्या घटनांमुळे वातावरण अधिकच गंभीर होत चालले आहे. इस्रायलने शुक्रवारी केलेल्या कारवाईत ६ पॅलेस्टाईन नागरिक मृत्युमुखी पडल्यानंतर गाझापट्टीमधून रॉकेटचा हल्ला इस्रायलवर करण्यात आल्याचे समजत आहे.
शुक्रवारी इस्रायलने केलेल्या कारवाईमध्ये सहा पॅलेस्टाईन नागरिक ठार झाल्यानंतर गाझामधून दक्षिण इस्रायलमध्ये रॉकेट सोडण्यात आले. इस्रायलच्या लष्करी सूत्रांनुसार हे रॉकेट मोकळ््या जागेत पडल्याने कोणतीही हानी झाली नाही. आतापर्यंत चाकू आणि बंदुकीच्या हल्ल्यामध्ये चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू झाला आहे. अल अक्सा मशिदीच्या आवारात निर्माण झालेल्या तणावामुळे सुरू झालेल्या इस्रायल-पॅलेस्टाईनमधील चकमकी अजूनही थांबण्याची चिन्हे नाहीत.
दगड, गलोल आणि चाकू
इस्रायली सैनिकांना विरोध करण्यासाठी पॅलेस्टाईनच्या तरुणांनी दगडफेक तसेच गलोलीचा वापर करण्यास सुरुवात केली आहे.
अश्रुधुरापासून वाचण्यासाठी विविध प्रकारचे मास्क घालूनच ते सैनिकांना सामोरे जात आहेत.
एकमेकांवर चाकू हल्ले करून बदला घेण्याची
नवी लढाई देखील सुरू झाली आहे.
पूर्व जेरुसलेम व गाझा पट्टीमधील शहरांमध्ये
हा तणाव वाढीस लागला आहे.
इस्रायल व पॅलेस्टाईनच्या नेत्यांनी संयुक्त राष्ट्राच्या नुकत्याच झालेल्या आमसभेतही या तणावाच्या पार्श्वभूमीवर मते मांडली; मात्र वाद थंड होण्याची चिन्हे नाहीत. इस्रायलचे पंतप्रधान बिन्यामिन नेत्यानाहू यांनी जर्मनी दौराही रद्द केला.