आनंदाची बातमी! कोरोनावरील व्हॅक्सीनचा नमुना तयार; इस्रायली शास्त्रज्ञाने मिळवले पेटंट
By ऑनलाइन लोकमत | Published: April 20, 2020 04:51 PM2020-04-20T16:51:38+5:302020-04-20T17:01:46+5:30
ही व्हॅक्सीन (लस) विद्यापीठाच्या जॉर्ज एस वाईज फॅकल्टी ऑफ लाइफ सायन्सेस इन स्कूल ऑफ मॉलिक्यूलर सेल बायोलॉजी अँड बायोटेक्नॉलॉजीचे प्राध्यापक जोनाथन गरशोनी यांनी प्रस्तावित केली आहे.
तेल अवीव : जग भरात धुमाकूळ घालणाऱ्या आणि हजारो लोकांचा बळी घेणाऱ्या कोरोना व्हायरसविरोधातील व्हॅक्सीन (लस) तयार करण्यात इस्रायलमधील एका शास्त्रज्ञाला यश आले आहे. तेल अवीव विद्यापीठात कार्यरत असलेल्या या शास्त्रज्ञाने कोरोना गटातील व्हायरस विरोधातील व्हॅक्सीनचा नमुना तयार करून त्याचे पेटंटदेखील मिळवले आहे. हे पेटंट 'यूनायटेड स्टेट्स पेटंट अँड ट्रेडमार्क ऑफिस'ने दिले असल्याची माहिती, तेल अवीव विद्यापीठाने एक पत्रक जारी करून दिली आहे. मिळालेल्या माहितीनुसार ही व्हॅक्सीन थेट कोरोनाच्या संरचनेवरच घाव घालून व्हायरसला निष्क्रिय करते.
ही व्हॅक्सीन (लस) विद्यापीठाच्या जॉर्ज एस वाईज फॅकल्टी ऑफ लाइफ सायन्सेस इन स्कूल ऑफ मॉलिक्यूलर सेल बायोलॉजी अँड बायोटेक्नॉलॉजीचे प्राध्यापक जोनाथन गरशोनी यांनी प्रस्तावित केली आहे. मात्र ही व्हॅक्सीन तयार करण्यासाठी आणखी काही महिने लागू शकतात, असेही या विद्यापीठाने स्पष्ट केले आहे. यानंतर या व्हॅक्सीनच्या वैद्यकीय चाचणीला सुरुवात होईल. यापूर्वी डब्ल्यूएचओने, सध्या कोरोना व्हायरसवरील उपचारासाठी लाभदायक व्हॅक्सीन तयार होण्याची शक्यता नाही, असे म्हटले होते.
गरशोनी यांनी सांगितले... -
गरशोनी म्हणाले, संशोधनाअंती लक्षात आले आहे, की हा व्हायरस सर्वप्रथम मानवाच्या शरीरातील पेशींच्या प्रोटीनच्या संपर्कात येतो आणि नंतर पेशीचा बाहेरील थर भेदून तो पेशीत प्रवेश करतो आणि संबंधित पेशी संक्रमित करायला सुरुवात करतो. हीच प्रक्रिया शरीरातील लाखो पेशींसोबत घडते. गरशोनी हे कोरोना गटातील व्हायरसवर गेल्या 15 वर्षांपासून अभ्यास करत आहेत. त्यांनी सार्स आणि मर्स व्हायरसवरही बरेच संशोधन केले आहे.
यापूर्वीही इस्रायलच्या दोन कंपन्यांनी केला होता दावा -
कोरोना व्हायरसवरील व्हॅक्सीन तयार केल्याचा दावा सर्वप्रथम ज्या देशांनी केला त्यात इस्रायलचाही समावेश आहे. गेल्या ११ एप्रिललाही दोन इस्रायली कंपन्यांनी कोरोनावरील व्हॅक्सीन तयार केल्याचा दावा केला होता. एवढेच नाही, तर जूनमध्ये या व्हॅक्सीनची चाचणी मानवावर सुरू होईल, असेही त्यांनी म्हटले होते.