इस्रायली गायिका लिओराला पुन्हा बॉलीवूडचे वेध
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 1, 2017 03:54 PM2017-07-01T15:54:06+5:302017-07-01T15:54:06+5:30
इस्रायली गायिका लिओरा यित्झॅक हिला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या इस्रायल भेटीत दोन्ही देशांची राष्ट्रगीते गाण्याची संधी मिळाली आहे.
Next
ऑनलाइन लोकमत
लॉड (इस्रायल) दि.1- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे इस्रायलमध्ये भारताचे राष्ट्रगीत जन गण मन आणि इस्रायलचे राष्ट्रगीत हकित्वा गाऊन केले जाणार आहे. इस्रायली गायिका लिओरा यित्झॅक हिला ही दोन्ही राष्ट्रगीते गाण्याची संधी मिळाली आहे. याबाबत बोलताना बॉलीवूडमध्ये गाण्याच्या आपल्या स्वप्नाला नव्याने संजीवनी मिळेल असे मत तिने व्यक्त केले आहे.
लिओराचे आई-वडिल मुंबईमधूनच इस्रायलला स्थलांतरित झाले होते. तिचा जन्म इस्रायलमध्येच झाला. बॉलीवूडमध्ये तिने सुरु केलेले करिअर सतत घराची तीव्र आठवण येऊ लागल्यामुळे सोडून दिले होते. आता पुन्हा ते सुरु होईल असे तिला वाटते. वयाच्या 15 व्या वर्षीच तिने शास्त्रीय संगीत शिकण्यासाठी पुण्याच्या सूर संवर्धन संस्थेत प्रवेश घेतला. पद्मा तळवलकर आणि पं. सुरेश तळवलकर यांच्याकडे तिने शिक्षण घेतले त्याचप्रमाणे 1991-98 या काळात तिने भजन आणि गझल गायनही शिकून घेतले. त्यानंतर तिला बॉलीवूडमध्ये संधी मिळाली. दिल का डॉक्टर या चित्रपटामध्ये तिने गाणे गायले. तिने कुमार सानू, उदित नारायण आणि सोनू निगम यांच्याबरोबरही गाणी गायली होती. बॉलीवूडमध्ये हा सगळा प्रवास सुरु असताना अचानक तिला कुटुंबाची प्रकर्षाने आठवण येऊ लागली. सलग आठ वर्षे कुटुंबापासून दूर राहिल्यामुळे होमसिक झालेल्या लिओराने गाण्याच्या काही ऑफर्स नाकारून इस्रायलला जाण्याचा निर्णय घेतला. "मी केवळ 23 वर्षांची होते, आठ वर्षे माझे आई-बाबा आणि भावंडांपासून दूर राहिल्यामुळे मी होमसिक झाले होते. मला भारत आवडतो पण तेव्हा कुटुंबापासून झालेली ताटातूट सहन होणारी नव्हती" अशा शब्दांमध्ये तिने आपल्या भावना माध्यमांसमोर मांडल्या. माला माला या तिच्या गाण्यामुळे लिओरा इस्रायलमध्ये प्रसिद्ध झाली. तसेच तू ही मेरा प्यार पहला या हिंदी- हिब्रू गाण्यामुळे तिचे इस्रायलच्या प्रत्येक घरात स्थान मिळाले. भारताचे राष्ट्रपती प्रणव मुखर्जी 2015 साली इस्रायलच्या दौऱ्यावर असताना इस्रायलच्या राष्ट्राध्यक्षांनी आयोजीत केलेल्या भोजनावेळेस गाण्याचीही तिला संधी मिळाली होती. आता भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासाठी नेत्यानाहू यांनी आयोजीत केलेल्या भोजन समारंभाप्रसंगीही ती गाणार आहे.
पंतप्रधान भेटणार मोशेला
26/11 रोजी झालेल्या दहशतवादी हल्ल्यामध्ये सुखरुप बचावलेला मुलगा मोशे यालाही पंतप्रधान नरेंद्र मोदी इस्रायल दौऱ्यामध्ये भेटणार आहेत. 2008 साली मुंबईतील खाबाद हाऊसवर झालेल्या हल्ल्यामध्ये मोशेचे आई-बाबा रिवका आणि गॅव्रिएल होल्टझबर्ग मारले गेले होते. मोशेची काळजी घेणारी दाई सॅंड्रा सॅम्युएल्स हिने त्याचे प्राण वाचवले होते. सॅंड्राच्या या धाडसी कृतीबद्द्ल इस्रायल सरकारने तिचा पुरस्कार देऊन सन्मानही केला होता.
आता मोशे त्याच्या आजी आजोबांबरोबर इस्रायलमध्ये राहतो. आता तो 11 वर्षांचा आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी मोशेच्या भेटीला येणार असल्याचे कळताच त्याचे आजी-आजोबा आनंदून गेले आहेत. "ज्यावेळेस भारतीय राजदुतांनी पंतप्रधान मोदी आमच्या भेटीला येणार असल्याचे सांगितले तेव्हा माझा माझ्या कानांवर विश्वासच बसला नाही. भारत आजही आमचे दुःख वाटून घेण्यास प्रयत्नशील असल्याचे पाहून आम्हाला फारच आनंद झाला" अशा शब्दांमध्ये मोशेचे आजोबा राबी शिमोन रोसेनबर्ग यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.