इस्रायली हल्ल्यांमुळे गाझातील सर्वात मोठे रुग्णालय उद्ध्वस्त; डब्ल्यूएचओचा आपत्कालीन विभागासाठी अलार्म जारी
By ऑनलाइन लोकमत | Published: December 18, 2023 06:01 AM2023-12-18T06:01:33+5:302023-12-18T06:02:53+5:30
हजारो विस्थापितांनी रुग्णालयाच्या इमारतीत आणि मैदानात आश्रय घेतला आहे आणि पिण्याच्या पाण्याची आणि अन्नाची तीव्र टंचाई आहे.
तेहरान : जागतिक आरोग्य संघटनेने (डब्ल्यूएचओ) इस्रायली बॉम्बस्फोटांनी उद्ध्वस्त झालेल्या गाझाच्या सर्वात मोठ्या अल-शिफा रुग्णालयातील आपत्कालीन विभागासाठी अलार्म जारी केला असून ‘रक्तरंजित’ असे तेथील परिस्थितीचे वर्णन केले आहे.
या रुग्णालयाच्या पुनरुत्थानाची गरज आहे, असेही डब्ल्यूएचओने म्हटले आहे. इस्रायलच्या हमासविरुद्धच्या युद्धात हे रुग्णालय उद्ध्वस्त झाले आहे. रुग्णालयात वैद्यकीय पुरवठा करणाऱ्या डब्ल्यूएचओच्या पथकाने आपत्कालीन विभागाचे वर्णन ‘रक्तरंजित’ असे केले आहे. हजारो विस्थापितांनी रुग्णालयाच्या इमारतीत आणि मैदानात आश्रय घेतला आहे आणि पिण्याच्या पाण्याची आणि अन्नाची तीव्र टंचाई आहे. विभागात शेकडो रुग्ण आहेत आणि दर मिनिटाला दाखल होत आहेत, रुग्णांवर जमिनीवरच उपचार करण्यात येत आहेत.
कोणतेही व्यवस्थापन उपलब्ध नाही, असे डब्ल्यूएचओने म्हटले आहे. अल-शिफा फार कमी कर्मचाऱ्यांसह कमी प्रमाणात कार्यरत आहे. अल अवदा आणि अल सहाबा वैद्यकीय संकुलात परिस्थिती चांगली नाही आणि संपूर्ण उत्तर गाझामध्ये अल-अहली अरब हे एकमेव अंशतः कार्यरत रुग्णालय आहे.
मूठभर डाॅक्टर...
एकेकाळी गाझामधील सर्वात महत्त्वाचे आणि सर्वात मोठे रुग्णालय अल-शिफामध्ये आता फक्त मूठभर डॉक्टर आणि काही परिचारिका आहेत, तर केवळ ७० स्वयंसेवक आहेत.
सध्या रुग्णालयात दररोज केवळ ३० रुग्ण डायलिसिस घेऊ शकतात.
येत्या काही आठवड्यांत अल-शिफा रुग्णालय अधिक सक्षम केले जाईल, जेणेकरून ते मूलभूत सेवा पुन्हा सुरू होऊ शकेल, असे डब्ल्यूएचओने
म्हटले आहे.
नाकेबंदी केलेल्या गाझापट्टीमध्ये युद्धापूर्वी २४ कार्यरत आरोग्य सुविधा होत्या.
ऑक्सिजन पुरवठ्याच्या कमतरतेमुळे गंभीर जखमींना शस्त्रक्रियेसाठी अल-अहली अरब रुग्णालयात हलवण्यात येत आहे.