इस्रायली रणगाडे गाझात घुसले; २५० ठिकाणांवर हल्ले, ओलिसांच्या सुटकेसाठी काही करु: नेतन्याहू
By ऑनलाइन लोकमत | Published: October 27, 2023 06:34 AM2023-10-27T06:34:41+5:302023-10-27T06:35:21+5:30
६,५०० पेक्षा अधिक पॅलेस्टिनी नागरिकांचा मृत्यू, १,४०० नागरिकांचा इस्रायलमध्ये मृत्यू, २२४ जण हमासने ठेवले ओलिस
रफाह : अमेरिकेच्या दबावाला झुकारून देत अखेर इस्रायलने गाझामध्ये सैनिक आणि रणगाडे घुसवत जमिनीवरून हल्ल्याला सुरुवात केली. बुधवारी रात्रभर २५० पेक्षा अधिक हल्ले करून हमासचे तळ, कमांड सेंटर, बोगदे आणि रॉकेट लाँचर यांना लक्ष्य करण्यात आले. यात हमासचे अनेक कमांडर ठार केले, तसेच हमासच्या पायाभूत सुविधा, टँकविरोधी क्षेपणास्त्र प्रक्षेपण स्थाने नष्ट करण्यात आली. युद्धाच्या पुढील टप्प्यासाठी आमच्या तयारीचा हा एक भाग होता, असे इस्रायलने म्हटले आहे.
हमासच्या सर्व सदस्यांचा मृत्यू जवळ आला आहे. हमासची लष्करी आणि प्रशासन क्षमता नष्ट करून त्यांना संपविणे आणि आमच्या ओलिसांना घरी आणण्यासाठी शक्य ते सर्व पाऊल उचलणे ही दोन मुख्य उद्दिष्टे आहेत, असे इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू म्हणाले.
६,५०० पेक्षा अधिक पॅलेस्टिनी नागरिकांचा मृत्यू, १,४०० नागरिकांचा इस्रायलमध्ये मृत्यू, २२४ जण हमासने ठेवले ओलिस
‘युद्ध मध्यपूर्वेच्या पलीकडे जाईल’
गाझामधील इस्रायलचे युद्ध मध्यपूर्वेच्या पलीकडे पसरू शकते, असा इशारा रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी दिला आहे. युद्धात निष्पाप महिला, मुले आणि वृद्ध लोकांना मारले जात आहे हे चुकीचे आहे. रक्तपात आणि हिंसाचार थांबवणे हे आमचे मुख्य काम असल्याचे पुतिन यांनी म्हटले आहे.
पत्रकाराच्या कुटुंबाचा मृत्यू
इस्रायलने गाझावर केलेल्या बॉम्बहल्ल्यात अल जझीराच्या पत्रकाराने आपले कुटुंब गमावले. अरबी भाषेचे ब्युरो चीफ वायल अल-दहदू हे मध्य गाझा येथील निर्वासित छावणीत राहत होते. हल्ल्यात त्यांची पत्नी, मुलगा, मुलगी आणि एक नुकताच जन्मलेला नातूही मारला गेला.
‘भारताने शस्त्रसंधीचे आवाहन करावे’
इस्रायल व हमासने शस्त्रसंधी करावी, असे आवाहन भारताने तातडीने करावे, अशी मागणी राज्यसभा खासदार कपिल सिबल यांनी केली आहे. या संघर्षात लहान मुले, महिला, नागरिकांनाही लक्ष्य केले जात आहे, असेही सिबल म्हणाले.
‘भारत-युरोप कॉरिडॉर हमासच्या हल्ल्याचे कारण’
वॉशिंग्टन : जी-२० परिषदेत घोषणा करण्यात आलेल्या भारत, मध्य पूर्वेतील देश, युरोप यांच्यामध्ये इकॉनॉमिक कॉरिडॉरमुळेच हमासने इस्रायलवर दहशतवादी हल्ला केला असावा, असे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांनी म्हटले आहे. इस्रायलवर झालेल्या हल्ल्याचे मी विश्लेषण केले. इकॉनॉमिक कॉरिडॉरच्या घोषणेमुळे हमास संघटना अस्वस्थ झाली असावी. माझ्या म्हणण्याला कोणताही सबळ पुरावा नाही. इकॉनॉमिक कॉरिडॉरमुळे इस्रायलबरोबरच अन्य देशांचीही प्रगती होणार आहे. नेमके हेच हमासला नको असावे, असे बायडेन म्हणाले.