"मध्यपूर्वेचा नकाशा बदलण्याची इस्रायलला संधी...", विरोधकांकडून नेतन्याहूंना मिळाला ग्रीन सिग्नल!
By ऑनलाइन लोकमत | Published: October 2, 2024 05:52 PM2024-10-02T17:52:52+5:302024-10-02T17:53:18+5:30
Israel-Iran War: आता इस्रायल सुद्धा इराणवर हल्ला करण्याच्या तयारीत आहे. इस्रायल इराणवर मोठा हल्ला करणार असल्याचे संकेत मिळत आहेत.
Israel-Iran War: इस्रायलच्या हल्ल्यात हिजबुल्लाहचा प्रमुख नेता सय्यद हसन नसरल्लाह याचा मृत्यू झाला. यानंतर इस्रायल आणि हिजबुल्लाह यांच्यातील संघर्ष आता पेटला आहे. यातच, इराणने प्रत्युत्तर देत इस्रायलवर हल्ला केला आहे. इराणकडून इस्रायलवर जवळपास १८० क्षेपणास्त्रे डागण्यात आली आहेत. त्यामुळे तणाव आणखी वाढला आहे. आता इस्रायल सुद्धा इराणवर हल्ला करण्याच्या तयारीत आहे. इस्रायल इराणवर मोठा हल्ला करणार असल्याचे संकेत मिळत आहेत.
इराणच्या आण्विक शस्त्रागारावर इस्रायल हल्ला करण्याचीही शक्यता आहे. विशेष म्हणजे इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांनाही इस्रायलच्या विरोधकांकडून हिरवा कंदील मिळाला आहे. इस्रायलचे माजी पंतप्रधान आणि कट्टर विरोधी पक्षनेते नेफ्टाली बेनेट यांनी मोठा संकेत दिला असून एक प्रकारे नेतान्याहू यांना हिरवा सिग्नल दिला आहे. नेफ्टाली बेनेट यांनी आपल्या एका पोस्टमध्ये म्हटले आहे की, मध्यपूर्वेचा नकाशा बदलण्याची इस्रायलसाठी ५० वर्षांतील ही पहिली मोठी संधी आहे. त्यांनी पुढे लिहिले आहे की, इस्रायलने आता इराणच्या आण्विक केंद्रावर हल्ला केला पाहिजे.
दरम्यान, नेफ्टाली बेनेट यांचे हे वक्तव्य अशा वेळी आले आहे, जेव्हा इस्रायल इराणवर मोठा हल्ला करण्याच्या तयारीत आहे. याचबरोबर, मध्यपूर्वेतील युद्ध अशा टप्प्यावर पोहोचले आहे, जिथे आता थेट अमेरिका सहभागी झाली आहे. इराणने केलेल्या इस्त्रायलच्या हल्ल्यानंतर मोठे देश सक्रिय झाले आहेत. अमेरिका आणि ब्रिटनसारख्या देशांनी लगेच इराणवर टीका करण्यास सुरुवात झाली.
दुसरीकडे, इराणच्या लष्कराने मंगळवारी रात्री इस्रायलवर बॅलेस्टिक क्षेपणास्त्रांचा मारा केला. या हल्ल्यात प्रामुख्याने लष्करी आणि सुरक्षा आस्थापनांना लक्ष्य करण्यात आले आहे. इस्लामिक रिव्होल्युशनरी गार्ड कॉर्प्सच्या निवेदनाचा हवाला देत, आंतरराष्ट्रीय मीडिया रिपोर्ट्सने पुष्टी केली आहे की, इराणकडून इस्रायलच्या दिशेने मोठ्या प्रमाणात क्षेपणास्त्रे डागण्यात आली आहेत. इस्रायलने प्रत्युत्तर दिल्यास आणखी एक हल्ला करण्याची धमकी इस्लामिक रिव्होल्युशनरी गार्ड कॉर्प्सने दिली आहे. मात्र, या हल्ल्यानंतर आता इस्रायल शांत बसणार नसल्याचे म्हटले जात आहे.