इस्रायलचे संस्थापक सदस्य शिमॉन पेरेस कालवश

By admin | Published: September 28, 2016 04:11 PM2016-09-28T16:11:16+5:302016-09-28T16:11:16+5:30

इस्रायलचे माजी राष्ट्राध्यक्ष शिमॉन पेरेस (९३) यांचे तेल अविव येथील शाबा मेडिकल सेंटर येथे निधन झाले.

Israel's Founder Member Simon Pérez | इस्रायलचे संस्थापक सदस्य शिमॉन पेरेस कालवश

इस्रायलचे संस्थापक सदस्य शिमॉन पेरेस कालवश

Next

ऑनलाइन लोकमत

तेल अविव, दि. 28 - देशाच्या स्थापनेपासून राजकीय क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या इस्रायलचे माजी राष्ट्राध्यक्ष शिमॉन पेरेस (९३) यांचे तेल अविव येथील शाबा मेडिकल सेंटर येथे निधन झाले. शांततेचा नोबेल पुरस्कार मिळवणारे त्याचप्रमाणे जगभरातील विविध देशांमध्ये लोकप्रिय असणाऱ्या पेरेस यांच्या निधनामुळे जगभरात दु:ख व्यक्त केले जात आहे. शुक्रवारी त्यांच्यावर जेरुसलेमच्या माऊंट हर्झेल येथील नॅशनल ज्युईश सिमेट्रीमध्ये अंत्यसंस्कार होणार आहेत. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा, अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष बिल क्लिंटन, ब्रिटनच्या राजघराण्याचे युवराज चार्ल्स तसेच विविध देशांचे नेते त्यांना अखेरचा निरोप देतील.
पेरेस यांचा जन्म २ आॅगस्ट १९२३ रोजी पोलंडमध्ये झाला. सुरुवातीचे शिक्षण पोलीश भाषेत झाल्यावर पेरेस यांनी फ्रेंच, इंग्रजी बरोबर हिब्रु भाषाही आत्मसात केली. १९३२ साली त्यांचे वडील इस्रायलमध्ये (तेव्हाचा मँडेटरी पॅलेस्टाईन) स्थायिक झाले. इस्रायलच्या राजकारणामध्ये प्रवेश केल्यानंतर शिमॉन यांनी वाहतूक, अर्थ, संरक्षण आणि परराष्ट्र व्यवहार खात्यांचा कार्यभार समर्थपणे सांभाळला होता. १९९५- १९९६ या कालावधीमध्ये ते इस्रायलचे आठवे पंतप्रधान झाले आणि २००७ साली ते इस्रायलचे नववे राष्ट्राध्यक्ष झाले. या कारकिर्दीत त्यांचा मपाई, राफी, लेबर, कादिमा अशा विविध पक्षांमधून राजकीय प्रवास झाला. इस्रायलचे प्रथम पंतप्रधान डेव्हीड बेन गुरियन यांच्याबरोबरही पेरेस यांनी काम केले होते तर गोल्डा मायर, यिटझॅक शामिर, यिटझॅक राबिन, अरायल शेरॉन यांच्या मंत्रिमंडळात ते सदस्य होते. इतका मोठा कार्यकाळ आणि एखाद्या देशाच्या सुरुवातीपासून सर्व जडणघडण पाहणारे ते एकमेव नेते असावेत.
इस्रायलसाठी सतत काम करणारा नेता म्हणून त्यांची ओळख होती. मागच्या वर्षी त्यांच्या निधनाच्या अफवा सर्वत्र पसरल्या होत्या तेव्हा त्यांनी स्वत:च फेसबूकवर माझे दैनंदिन जीवन नेहमीप्रमाणे सुरु असून इस्रायली जनतेला मदत करण्याचे काम सुरुच आहे असे स्पष्ट केले होते. दुर्देवाने यावेळेस त्यांनी सर्वांचा अखेरचा निरोप घेतला आहे.
जगभरातील नेत्यांनी वाहिली श्रद्धांजली
पेरेस यांच्या निधनानंतर इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेत्यानाहू यांनी तीव्र दु:ख व्यक्त केले असून यामुळे आपल्याला व्यक्तिश: मोठे दु:ख झाल्याची भावना तयंनी व्यक्त केली आहे. त्यांच्या निधनामुळे इस्रायलने लाडका नेता गमावला असे त्यांनी शोकसंदेशात म्हटले आहे. भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही पेरेस यांच्या निधनाने एक प्रमुख जागतीक नेते व भारताचे मित्र आपण गमावला आहे, त्यांच्या निधनाने आम्हाला दु:ख झाले असून इस्रायली जनतेच्या दु:खात आम्ही सहभागी आहोत असे ट्विट केले आहे.
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांनीही पेरेस आमचे आवडते मित्र होते, अमेरिका आणि इस्रायलमध्ये नाते वृद्धींगत होण्यासाठी पेरेस यांच्याइतके दीर्घकाळ काम कोणीच केले नसावे, पेरेस हे ज्यू लोकांसाठी, इस्रायसाठी, न्याय आणि शांततेसाठी प्रयत्न करणारे सैनिक होते. त्यांचे निधन झाल्यामुळे एक प्रकाशज्योत मालवल्यासारखे वाटतेय, पण त्यांनी जागवलेली आशा आमच्या मनात कायम राहिल अशा शब्दांमध्ये भावना व्यक्त केल्या आहेत. रशियाचे अध्यक्ष व्लादिमिर पुतीन यांनीही पेरेस यांना श्रद्धांजली वाहिली आहे.

शांतीदूत
पेरेस यांना इस्रायलच्या शांततेचा चेहरा असे म्हटले जाई. पॅलेस्टाईन आमचे सर्वात जवळचे शेजारी आहेत आणि मला खात्री आहे ते एके दिवशी आमचे सर्वात जवळचे मित्रही होतील असे ते नेहमी म्हणत. १९९४ साली त्यांना पॅलेस्टाईनचे नेते यासर अराफात यांच्यासह नोबेल सन्मान देऊन गौरविण्यात आले. २०१२ साली बराक ओबामा यांच्याहस्ते त्यांना प्रेसिडेंशियल मेडल आॅफ फ्रीडम हा पुरस्कार देण्यात आला. याशिवाय जगभरातील विविध पुरस्कार त्यांना मिळाले होते.
ग्रंथसंपदा
शिमॉन पेरेस यांनी ११ पुस्तकांचे लेखन केले. त्यांनी लिहिलेले बेन गुरियान- अ पॉलिटिकल लाईफ हे पुस्तक विशेष गाजले, ते स्वत:ला बेन गुरियनिस्ट म्हणवून घेत. त्यांची डेव्हीड्स स्लींग, अँड नाऊ टुमारो, एंटेबी डायरी, द न्य मिडल इस्ट, फॉर द फ्युचर आॅफ इस्रायल ही पुस्तके प्रसिद्ध आहेत.
 

Web Title: Israel's Founder Member Simon Pérez

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.