इस्राइलकडून इराणवर तुफानी हल्ला, अणुकेंद्रावर क्षेपणास्त्र डागल्याचा दावा, स्फोटाच्या आवाजाने शहरं हादरली
By ऑनलाइन लोकमत | Published: April 19, 2024 08:34 AM2024-04-19T08:34:48+5:302024-04-19T08:35:13+5:30
Isriael Attack On Iran: इराणने ड्रोण आणि क्षेपणास्त्रांच्या मदतीने केलेल्या हल्ल्यानंतर आता इस्राइलने इराणला प्रत्युत्तर देण्यास सुरुवात केली आहे. आज इस्राइलने इराणवर क्षेपणास्त्रांच्या सहाय्याने मोठा हल्ला केल्याची बातमी समोर येत आहे.
इराणने ड्रोण आणि क्षेपणास्त्रांच्या मदतीने केलेल्या हल्ल्यानंतर आता इस्राइलने इराणला प्रत्युत्तर देण्यास सुरुवात केली आहे. आज इस्राइलने इराणवर क्षेपणास्त्रांच्या सहाय्याने मोठा हल्ला केल्याची बातमी समोर येत आहे. मिळत असलेल्या माहितीनुसार इस्राइलने इराणच्या अणुकेंद्रांना लक्ष्य करून क्षेपणास्त्रे डागली आहेत. तसेच इसाफहान शहरातील विमानतळावर स्फोटांचे आवाज ऐकू आल्याचा दावा इराणच्या सरकारी वृत्तवाहिन्यांनी केला आहे.
सिरीयामधील इराणच्या दुतावासावर इस्राइलने केलेल्या कथित एअरस्ट्राइकनंतर पश्चिम आशियामधील तणाव वाढीस लागला होता. तसेच इराणने इस्राइलवर प्रत्युत्तरदाखल करावाई करताना शेकडो ड्रोण आणि क्षेपणास्त्रांच्या मदतीने इस्राइलवर हल्ला केला होता. त्यानंतर इस्राइलच्या मित्र देशांनी त्याला संयमी भूमिका घेण्याचं आवाहन केलं होतं. मात्र इराणला कसं आणि कधी प्रत्युत्तर द्यायचं, हे आम्ही ठरवू, असा इशारा इस्राइलकडून देण्यात आला होता.
दरम्यान, इस्राइलने इराणच्या अणुकेंद्रावर तीन क्षेपणास्त्र डागल्याचा दावा करण्याता येत आहे. इराणच्या सरकारी वृत्तवाहिनीने इराणधील इसाफहान शहरातील विमानतळावर स्फोटाचे आवाज ऐकू आल्याचा दावा केला आहे. या शहरामध्ये इराणची अनेक अणुकेंद्रं आहेत. तसेच इराणचा सर्वात मोठा युरेनियमि संवर्धनाचा कार्यक्रमही इथूनच चालतो. दरम्यान, या हल्ल्यानंतर अनेक विमानांची उड्डाणं दुसरीकडून वळवण्यात आली आहेत.