अमेरिकेत एकाच वेळी दोन व्हिसा नेण्याची परवानगी आहे का?
By ऑनलाइन लोकमत | Published: February 2, 2019 10:00 AM2019-02-02T10:00:00+5:302019-02-02T10:00:02+5:30
एकाचवेळी दोन व्हिसा असल्यास त्यांचा वापर कसा करावा?
प्रश्न: माझ्याकडे सध्या अमेरिकेचा वैध टुरिस्ट (B1/B2) व्हिसा आहे. अमेरिकेत मास्टर्सचं शिक्षण घेण्यासाठी माझी निवड झाली आहे. त्यासाठी मी पुढील महिन्यात स्टुडंट व्हिसासाठी (F1) अर्ज करणार आहे. अमेरिकेत एकाचवेळी दोन व्हिसा बाळगण्याची परवानगी असते का? माझ्याकडे एकापेक्षा अधिक व्हिसा असल्यास, अमेरिकेत प्रवास करताना मी नेमका कोणता व्हिसा वापरावा?
उत्तर: हो, तुम्हाला एकाचवेळी दोन प्रकारचे व्हिसा (टुरिस्ट आणि स्टुडंट) बाळगण्याची परवानगी आहे. प्रत्येक व्हिसा वेगवेगळ्या कारणांसाठी देण्यात येतो आणि तुम्ही तो योग्य कामांसाठी वापरायला हवा.
जर तुम्ही शैक्षणिक कारणांसाठी किंवा ऑप्शनल प्रॅक्टिकल ट्रेनिंगसाठी (ओपीटी) अमेरिकेत प्रवास करत असाल, तर तुम्हाला देशात प्रवेश करताना स्टुडंट व्हिसाचा वापर करावा लागेल. अमेरिकेत शिक्षण घेण्यासाठी किंवा शैक्षणिक कार्यक्रमांमध्ये सहभागी होण्यासाठी तुम्ही टुरिस्ट व्हिसा वापरु शकत नाही. अमेरिकेत प्रवेश करताना तुम्हाला इमिग्रेशन अधिकाऱ्यांना स्टुडंट व्हिसा आणि आय-20 फॉर्म दाखवावा लागेल. (आय-20 फॉर्म शैक्षणिक संस्थेकडून दिला जातो.)
जर तुम्हाला पर्यटन करायचं असेल, अभ्यास किंवा ओपीटीसाठी तुम्ही प्रवास करत नसाल, अशा परिस्थितीत तुम्हाला टुरिस्ट व्हिसाचा वापर करावा लागेल.
स्टुडंट व्हिसावर प्रथमच प्रवास करताना, तुमचा शैक्षणिक कार्यक्रम सुरू होण्याच्या 30 दिवस आधी तुम्ही अमेरिकेत येऊ शकता. त्याच्याआधी तुम्हाला प्रवेश दिला जाणार नाही. तुमचा शैक्षणिक कार्यक्रम सुरू होण्याची तारीख आय-20 फॉर्मवर असते. काही विद्यार्थ्यांना घर शोधण्यासाठी, मित्र किंवा नातेवाईकांना भेटण्यासाठी थोडं आधीच अमेरिकेत यायचं असतं. परंतु, स्टुंडट व्हिसाच्या नियमांनुसार, तुम्हाला महिनाभरच आधी येता येऊ शकतं. अशावेळी तुम्हाला अमेरिकेत प्रवेश करताना टुरिस्ट व्हिसाचा वापर करावा लागेल. शैक्षणिक अभ्यासक्रम सुरू करण्यापूर्वी तुम्हाला व्हिसात बदल करण्यासाठी यूएस सिटीझनशिप अँड इमिग्रेशन सर्व्हिसेसकडे (यूएससीआयएस) अर्ज करावा लागेल. याशिवाय अमेरिकेतून बाहेर पडण्याचा आणि अभ्यास पूर्ण करण्यासाठी परतताना स्टुडंट व्हिसा दाखवण्याचा पर्याय तुमच्याकडे आहे.