मोबाईल अॅपमधून रक्तदाब मोजणे धोकादायक
By Admin | Published: March 3, 2016 04:29 PM2016-03-03T16:29:55+5:302016-03-03T16:29:55+5:30
मोबाईल अॅपमधून रक्तदाबाची जी आकडेवारी मिळते ती चुकीची असून, यामुळे रुग्णाची दिशाभूल होते असे अमेरिकी संशोधकांच्या अभ्यासातून समोर आले आहे.
ऑनलाइन लोकमत
मियामी, दि. ३ - शरीरातील रक्तदाब मोजण्यासाठी काही मोबाईल अॅप विकसित झाली आहेत. या मोबाईल अॅपमधून रक्तदाबाची जी आकडेवारी मिळते ती चुकीची असून, यामुळे रुग्णाची दिशाभूल होते असे अमेरिकी संशोधकांच्या अभ्यासातून समोर आले आहे. इन्स्टंट ब्लड प्रेशर नावाचे मोबाईल अॅप आतापर्यंत एकलाखापेक्षा जास्त मोबाईलमध्ये डाऊनलोड झाले आहे.
ऑगस्ट २०१५ मध्येच अॅपल स्टोरमधून हे अॅप काढून टाकण्यात आले तरी अजूनही ब्लड प्रेशर मोजण्यासाठी या अॅपचा वापर सुरु आहे असे जॉन्स हॉपकीन्स विद्यापीठ स्कूल ऑफ मेडिसिनच्या संशोधकांनी सांगितले. या अॅपने रक्तदाब मोजताना १० पैकी ८ रुग्णांच्या रक्तदाबाचे चुकीचे निदान केले, असे या सर्वेक्षणात म्हटले आहे.
या अॅपवर अवलंबून राहिल्यामुळे रक्तदाबाशी संबंधित विविध आजार असलेल्या रुग्णांच्या प्रकृतीला गंभीर धोका उदभवू शकतो असे या सर्वेक्षणात म्हटले आहे. अमेरिकेच्या जेएएमएमध्ये हा अभ्यास अहवाल प्रकाशित झाला आहे. हाताच्या दंडाला पट्टा बांधून रक्तदाब मोजण्याची पद्धत योग्य असल्याचे या अहवालात म्हटले आहे.