यहा डरना मना है...!
By admin | Published: November 1, 2015 02:41 AM2015-11-01T02:41:33+5:302015-11-01T02:41:33+5:30
अमेरिकेत सध्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीचा माहोल आहे. आश्वासने तर दिली जात आहेतच; पण धमक्याही आहेत. त्यामुळे यहा डरना मना है, असे म्हटले तर वावगे ठरूनये.
वॉशिंग्टन : अमेरिकेत सध्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीचा माहोल आहे. आश्वासने तर दिली जात आहेतच; पण धमक्याही आहेत. त्यामुळे यहा डरना मना है, असे म्हटले तर वावगे ठरूनये.
रिपब्लिकन पार्टीकडून अध्यक्षपदाच्या निवडणुकीत उमेदवारीच्या रेसमध्ये सर्वात पुढे असलेले डोनाल्ड ट्रंप प्रचारात सांगत आहेत की, ते जर अध्यक्ष झाले तर अमेरिकेत विनापरवाना राहणाऱ्या एक कोटी लोकांना ते एका झटक्यात देशातून बाहेर काढणार आहेत. त्यामुळे अनेक लोकांना धडकी भरली नसेल तरच नवल.
कल्पना करा की, असे झाले तर अमेरिकेत शेतात काम करायला, दुकानात हलके काम करायला कोणी नसेल, हॉटेलमध्ये कामासाठी, घरांची देखभाल करण्यासाठी कोणी असणार नाही.
एवढेच कमी होते म्हणून की काय ते म्हणाले की, आमच्या सरकारमध्ये देशात कुठेही तुम्ही बंदूक घेऊन फिरु शकाल. आता बोला? आॅफिस असो की, दुकान कुठेही फिरा बंदूक घेऊन. पोलिसांचा राग आला, बारमध्ये काही विपरीत घडले? चिंता करू नका, लगेच बंदूक काढा.
एका उमेदवारांची ही वक्तव्ये कमी होती म्हणून की काय दुसऱ्यांनीही त्यांचीच री ओढली. कोणी समलैंगिकतेविरोधात बोलत आहे. कोणाला इराकमध्ये पुन्हा अमेरिकी फौज पाहिजे, तर कोणी रशियाला धडा शिकवू म्हणतेय.
आता तसे पाहू गेल्यास अमेरिकेत अगोदरच काय भिण्यासारख्या गोष्टी कमी आहेत? चोवीस तास फोन ऐकण्याची भीती, ई-मेलची भीती, औषधांच्या किमती एकदम पाचशे पटींनी वाढण्याची भीती, बँकांचे दिवाळे निघण्याची भीती, काळ्या समुदायाची भीती, फेसबुकच्या डिस्लाईकची भीती आणि पुन्हा हॅलोविन? सध्या ट्रंप यांचे मुखवटे मोठ्या प्रमाणात विकले जात आहेत. येथे मुखवट्याची विक्री ही त्या व्यक्तीची लोकप्रियता अधोरेखित करते, असे स्पिरिट हॅलोविन या वेबसाईटचे म्हणणे आहे.
काय आहे हॅलोविन?
अमेरिकेत ३१ आॅक्टोबर हा हॅलोविन दिवस आहे. या दिवशी लहानांपासून ते मोठ्यांपर्यंत सर्व जण हॉरर फिल्म पाहतात, भीतिदायक मास्क लावतात, अशा स्वरूपात या दिवशी पारंपरिक पद्धतीने हॅलोविन दिन साजरा करतात.